हनी ट्रॅप : व्यापार्‍यांना जाळ्यात ओढणारी तिसरी टोळीही गजाआड | पुढारी

हनी ट्रॅप : व्यापार्‍यांना जाळ्यात ओढणारी तिसरी टोळीही गजाआड

उजळाईवाडी; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरातील आणखीन एका बड्या व्यापार्‍याला ‘ हनी ट्रॅप ’ मध्ये ओढून एक लाख रुपयाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘ हनी ट्रॅप ’चा पाचवा गुन्हा शनिवारी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात दाखल झाला. याप्रकरणी तिसरी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केली आहे. 12 ऑगस्ट 2021 रोजी चित्रनगरी परिसरातील हॉटेल रचना येथे सायंकाळी हा गुन्हा घडला होता.

याप्रकरणी जितेंद्र रावसाहेब शिंदे (वय 26), प्रथमेश सतीश शिंगे (22, दोघे रा. यादवनगर, कोल्हापूर) या संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणातील संशयित महिला आरोपीला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विजय कारंडे, किरण गावडे, कुमार पोतदार, प्रदीप पोवार, रवींद्र कांबळे यांनी तिसर्‍या टोळीला शनिवारी पकडून गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

मार्केट यार्डमधील एका व्यापार्‍याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, एका अनोळखी स्त्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख केली. त्यानंतर चॅटिंगच्या माध्यामतून व्यापार्‍याबरोबर जवळीकता निर्माण केली. यानंतर चित्रनगरी रोडवरील रचना लॉजिंग-बोर्डिंग येथे व्यापार्‍याला बोलावले. तेथे संशयित महिलेने जितेंद्र शिंदे व प्रथमेश शिंगे यांच्या मदतीने धमकावले. यावेळी व्यापार्‍याकडून सुमारे नव्वद हजार रुपये उकळले. त्यानंतरही संशयित आरोपींनी व्यापार्‍याकडे 35 हजार रुपयांसाठी तगादा लावला होता. ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या व्यापार्‍याने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर संशयितांना अटक करण्यात आली. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

Back to top button