हिरव्या डोळ्यांची ‘अफगाणी मोनालिसा’ पुन्हा चर्चेत! | पुढारी

हिरव्या डोळ्यांची ‘अफगाणी मोनालिसा’ पुन्हा चर्चेत!

रोम : वृत्तसंस्था

सन 1985 मध्ये एका छायाचित्राने अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. फोटोग्राफर स्टिव्ह मॅक्केरी यांनी छायाचित्रातील तरुणीला (शरबत गुल) ‘अफगाणिस्तानची मोनालिसा’ म्हटले होते. बारा वर्षांची असताना ती पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील एका शरणार्थी शिबिरात राहत होती. गुल शरबत आता 48 वर्षांची आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा जमविल्यानंतर शरबत गुल हिला आम्ही तालिबानपासून वाचविले आमच्या देशात आणले आहे, असे इटली सरकारने जाहीर केले आहे. अर्थात, इटलीने एकट्या शरबतला आपल्या देशात आणलेले आहे, असे नाही. तालिबानपासून धोका असलेले अनेक जण त्यात आहेत.

सन 1980 मध्ये अमेरिकन फोटोग्राफर मॅक्केरी यांनी टिपलेले शरबत हिचे छायाचित्र 1985 मध्ये नॅशनल जिओेग्राफिक मासिकाचे मुखपृष्ठ बनले होते आणि हे घडताच शरबत ही जगातील सर्वांत जास्त लोकप्रिय शरणार्थी ठरली. अफगाणिस्तानला ‘खुदा हाफिज’ ठोकू इच्छिणार्‍यांना तेथून बाहेर काढण्याचे कार्य करणार्‍या एका स्वयंसेवी संस्थेने शरबत गुल हिलाही अफगाणिस्तानातून बाहेर काढावे, अशी विनंती इटली सरकारला केली होती. इटली सरकारने आता शरबत हिच्या रहिवासाची व्यवस्था रोममध्ये केली आहे. शरबतला 4 मुले आहेत. रशियन आक्रमणानंतर 1979 मध्ये लाखो अफगाणांनी पाक सीमेचा आसरा घेतला होता. शरबतही त्यात होती, मात्र 2016 मध्ये पाकिस्तानने शरबत हिला बनावट ओळखपत्र बाळगण्याच्या आरोपाखाली 2 आठवडे कारागृहात ठेवले होते. नंतर पुन्हा अफगाणिस्तानात पाठवून दिले. अफगाणिस्तानातील अशरफ गनी सरकारने शरबत हिला घर, शेतजमीन व आर्थिक मदत केली होती. हे सरकार पडले. तालिबान आले आणि शरबतच्या घराचे वासे पुन्हा फिरले होते.

दर्यादिल इटली! 
मारिया बशरनंतर शरबत गुल!!

इटलीने सप्टेंबरच्या सुरुवातीला जवळपास 5 हजार अफगाण नागरिकांची तालिबानपासून सुटका केली होती. या बचाव मोहिमेत इटलीसह अमेरिका, जर्मनी, ब्रिटन आणि तुर्कस्तान सहभागी होते. इटलीने याआधी अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला मुख्य अधिवक्ता मारिया बशीर यांना नागरिकत्व दिले होते. आता हिरव्या डोळ्यांच्या शरबत गुललाही इटलीने नागरिकत्व दिले आहे.

हे देखील वाचा :

Back to top button