omicron variant : महाराष्ट्रात लस नाही, तर प्रवास, शॉपिंग नाही; नवीन नियम माहीत आहेत का? | पुढारी

omicron variant : महाराष्ट्रात लस नाही, तर प्रवास, शॉपिंग नाही; नवीन नियम माहीत आहेत का?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा 

डेल्टा व्हेरियंटपेक्षा प्रचंड गतीने संसर्ग करणार्‍या आणि दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घालणार्‍या ‘ओमिक्रॉन’ (omicron variant) या नव्या कोरोना विषाणूचे संकट जगावर घोंघावू लागताच महाराष्ट्र सतर्क झाला आहे. लसीकरण अत्यल्प असलेल्या देशांमध्येच ‘ओमिक्रॉन’ विषाणूचे थैमान सुरू झाले आहे, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने शनिवारी अनेक कडक नियम जारी केले. लोकांनी लस घ्यावी हा हेतू या नियमांमागे असून, लस न घेणार्‍या लोकांच्या दळणवळणावर या नियमांनी निर्बंध आणले आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे दोन डोस न घेता मॉल, दुकानांत प्रवेश केल्यास किंवा प्रवास केल्यास 10 हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. रविवारी राज्य पातळीवर होणार्‍या प्रशासकीय बैठकीत नव्या व्हेरियंटच्या (omicron variant) अनुषंगाने निर्बंधांबाबत निर्णय अपेक्षित आहे. मुंबई महापालिकेनेही या नव्या संकटाचा सामना करण्याची तयारी केली असून, ‘ओमिक्रॉन’चा एक रुग्ण सापडला तरी संपूर्ण इमारत सील केली जाणार आहे.

शाळांच्या बाबतीत निर्णय घेतला जाणार

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय यापूर्वी जाहीर करण्यात आला आहे. मात्र, शाळा सुरू करायच्या की तूर्त बंदच ठेवायच्या, याचा निर्णय या बैठकीत होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: ही बैठक ऑनलाईन घेणार असून, प्रशासनातील सर्व प्रमुख आणि आरोग्य खात्याचे अधिकारी या बैठकीस उपस्थित असतील.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सूचनेनुसार नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्‍त तसेच
नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची दूरद‍ृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीत मुंबई महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त सुरेश काकाणी यांनी महापालिकेने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. मुंबई विमानतळावर विदेशातून येणार्‍या प्रवाशांना विलगीकरण सक्‍तीचे करण्यात येणार असून, कोणत्याही परिस्थितीत त्यांना घरी विलगीकरणात राहता येणार नाही.

तरी संपूर्ण इमारत सील केली जाणार

‘ओमिक्रॉन’चा  (omicron variant) रुग्ण आढळलाच, तर कोरोना उपचार केंद्रांमध्ये अशा रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल. मुंबईत आजघडीला एकही इमारत सील नाही. कोरोनामुक्‍तीकडे वाटचाल करणार्‍या मुंबईत ‘ओमिक्रॉन’चे संकट येऊ नये आणि आलेच, तर ते वाढू नये म्हणून ‘ओमिक्रॉन’चा एक जरी रुग्ण आढळला तरी संपूर्ण इमारत सील केली जाणार असल्याचे काकाणी म्हणाले.

प्रवाशांची यादी पालिकेकडे मुंबईत हा नवा विषाणू विमानतळावरूनच येऊ शकतो, हे स्पष्ट असल्याने अतिधोकादायक 14 देशांतून येणार्‍या प्रवाशांची यादी विमानतळांकडून नियमित घेण्याच्या सूचना नगरविकासमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या. ‘ओमिक्रॉन’चे रुग्ण सापडलेल्या देशांमधून आलेल्या प्रवाशांची माहितीही सर्व महापालिकांनी आपल्याकडे ठेवावी, असे ते म्हणाले.

दवाखाने पुन्हा सज्ज मुंबई महापालिकेची वैद्यकीय सेवासुविधा पुन्हा सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे. नव्या कोरोना व्हेरियंटचा मुंबई शहरात संसर्ग पसरण्याची जास्त शक्यता असल्यामुळे विमानतळावर आरोग्य विभागाच्या डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचार्‍यांची टीम तैनात करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

विमानतळावर उतरणार्‍या प्रवाशांचे हॉटेलमध्ये की महापालिकेच्या विलगीकरण कक्षामध्ये विलगीकरण करायचे, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. कोव्हिड अनुरूप वर्तनविषयक नियम कोव्हिड-19 विषाणूचा प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यामुळे त्याच्या प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी प्रत्येक व्यक्‍तीने व संस्थेने कोव्हिड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यासाठी हँड सॅनिटायझर, साबण व पाणी, तापमापक आदींचा वापर केला पाहिजे. नाक व तोंड मास्कने झाकलेले असले पाहिजे. (रुमालाला, मास्क समजले जाणार नाही आणि रुमाल वापरणारी व्यक्‍ती, दंडास पात्र असेल.)

जेथे शक्य असेल तेथे नेहमी सामाजिक अंतर (6 फूट अंतर) राखावे. खोकताना किंवा शिंकताना टिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाक झाका आणि वापरलेले टिश्यू पेपर नष्ट करा. जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल, तर त्याने स्वतःचा हात नव्हे, तर हाताचा वाकवलेला कोपरा नाका-तोंडावर ठेवून खोकावे व शिंकावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर (6 फूट अंतर) राखा. कोणालाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार अथवा अभिवादन करावे, अशा सूचना केल्या आहेत.

राज्यात येणार्‍या प्रवाशांना संपूर्ण लसीकरणासोबतच आरटी-पीसीआर अनिवार्य

महाराष्ट्र राज्यात प्रवास करताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्थानावरून राज्यात येणार्‍या सर्व प्रवाशांना केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे लागू राहतील. राज्यात येणार्‍या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे एक तर यात यापुढे व्याख्या केल्यानुसार संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा 72 तासांसाठी वैध असलेले आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (omicron variant)

अशी आहे नियमावली

 • दुकाने, मॉल्समध्ये दोन डोसशिवाय प्रवेश केल्यास किंवा दिल्यास 10 हजार रुपये दंड.
 • टॅक्सी/खासगी वाहतूक, चारचाकी किंवा बसमध्ये दोन डोस न घेता आढळून आल्यास, त्याला 500 रुपये दंड ठोठावला जाईल. त्याचबरोबर चालक/क्‍लीनर/वाहकाला 500 रुपयांचा दंडही ठोठावला जाईल.
 • बसेसच्या बाबतीत, वाहतूक एजन्सीच्या मालकास 1,000 रुपये दंड आकारला जाईल.
 • सार्वजनिक किंवा सामाजिक मेळावा एखाद्या बंदिस्त ठिकाणी म्हणजे सिनेमा हॉल, थिएटर, विवाह हॉल, दीक्षांत सभागृहात होत असेल, तर जागेच्या क्षमतेच्या फक्‍त 50 टक्के परवानगी दिली जाईल.
 • एकूण क्षमतेच्या केवळ 25 टक्के लोकांना खुल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची परवानगी असेल.
 • दोन डोस घेतले आहेत असेच लोक सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करू शकतील.ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत तेच कोणत्याही दुकानात, व्यावसायिक प्रतिष्ठानामध्ये, मॉलमध्ये, कार्यक्रमात किंवा इतर सामाजिक मेळाव्यात जाऊ शकतात.
 • ज्यांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे तेच लोक कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील. कोविन प्रमाणपत्र दाखवून सामाजिक मेळाव्यातही सहभागी होऊ शकतात.
 • दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचार्‍यांनाच कोणत्याही कार्यालयामध्ये किंवा व्यावसायिक आस्थापनांमध्ये प्रवेश.
 • 1,000 पेक्षा जास्त लोकांचा जमाव कुठेही जमल्यास त्याची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देण्यात यावी.
 • कोरोना नियमांचे पालन न करणार्‍या व्यक्‍तींना 500 रुपयांचा दंड आकारला जाईल.
 • कोणत्याही संस्थेने या नियमांचे पालन केले नाही, तर त्यांना 50 हजार रुपये दंड आकारला जाईल.
 • देशांतर्गत प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील किंवा 72 तासांचा वैध ठढ-झउठ नकारात्मक अहवाल असेल, तरच त्यांना महाराष्ट्रात प्रवेश दिला जाईल.

हे ही वाचलं का?

 

Back to top button