देशात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या मोठ्या आंदोलनाला आज यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नऊ वाजता तीन कृषी कायदे (#FarmLaws) रद्द करण्याची घोषणा केली. या तीन कायद्यांविरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांनी मागिल एक वर्षापासून आंदोलन छेडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे कायदे रद्द करण्याची घोषणा करुनही दिल्लीतील शेतकऱ्यांनी अजुनही आंदोलन पाठिमागे घेतलेले नाही असे शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकेत यांनी सांगितलं आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी ९ वाजता देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांबाबत (farmerslaws) मोठा निर्णय जाहीर केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन कृषी कायदे आणले होते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. गेल्या वर्षभरापासून हे आंदोलन कायम आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.
"आज मी संपूर्ण देशाला सांगतो की आम्ही तीन कृषी कायदे (farmerslaws) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या संसद अधिवेशन सत्रात तीन कृषी कायदे रद्द (Repeal) करण्याची संविधानिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. कृषी अर्थतज्ज्ञांनी, शास्त्रज्ञांनी, प्रगतशील शेतकऱ्यांनी कृषी कायद्याचे (farmerslaws) महत्व समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण शेतकऱ्यांच्या हिताची ही गोष्ट आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करुनही काही शेतकऱ्यांना ती समजली नाही." असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
हे तीनही कृषी कायदे रद्द केल्यानंतर सोशल मीडियावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. शेतकरी नेते राकेश टिकेत यांनीही कृषी कायदे रद्द केल्यानंतर प्रतिक्रिया देली आहे.
आम्ही आंदोलन तत्काळ पाठिमागे घेणार नाही. आम्ही त्या दिवसाची वाट पाहणार जेव्हा कृषी कायदे संसदेत रद्द करतील. सरकार MSP सोबत शेतकऱ्यांच्या दुसऱ्या मुद्द्यांवरही चर्चा करणार आहे. अस राकेश टीकेत यांनी म्हटलं आहे.