वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू! पत्नीचा पतीला वाचवण्यासाठीचा प्रयत्न अपयशी | पुढारी

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू! पत्नीचा पतीला वाचवण्यासाठीचा प्रयत्न अपयशी

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : बांधावर तुरी लावण्याकरीता पत्नी सोबत गेलेल्या एका 45 वर्षीय शेतकऱ्याला स्वत:च्याच शेतातून आज (दि. ११) मंगळवारी दुपारच्या सुमारास वाघाने उचलून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना चिमूर तालुक्यातील सावरगाव शेतशिवारात आज (दि. ११) मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. पत्नीने पतीला वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु जंगलाच्या दिशेने वाघाने तोंडात घेऊन गेल्याने जीव वाचू शकला नाही. तब्बल तीन तासांनी शेतकऱ्याचा मृतदेह वनविभागाच्या हाती लागला आहे. ईश्वर गोविंदा कुंभारे असे मृतकाचे नाव असून तो चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील रहिवासी होता.

घटनेची इकीकत अशी की, सावरगाव पासून २ किमी अंतरावर शेतकरी ईश्वर कुंभारे यांचे स्वत:चे शेत आहे. शेताला लागूनच घनदाट जंगल आहे. या जंगलात वाघाचा वावर आहे. त्यामुळे या परिसरात भितीचे वातावरण बऱ्याच दिवसापासून आहे. मंगळवारी (दि. ११) सकाळी हा शेतकरी शेतातील कामाकरिता पत्नीला सोबत घेऊन गेला होता. पती व पत्नी दोघेही शेतात काही अंतरावर तुरी लावत असताना दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अचानक वाघाने जंगलातून येऊन पती ईश्वर कुंभारे यांच्यावर हल्ला केला. या शेतकऱ्याला  तोंडात पकडून वाघ जंगलाच्या दिशने गेला. हा संपूर्ण प्रकार पत्नीच्या डोळ्या देखत घडल्याने ती घाबरली. पतीला वाचविण्याकरीता वाघ ज्या देशेने गेला त्या दिशेला त्या धावल्या. पत्नीने लगतच्या शेतकऱ्याकडे मतदतीसाठी धाव घेतली. प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत पत्नीने घडलेला सर्व प्रकार अन्य शेतकऱ्यांना सांगितला.

काही शेतकरी मदतीला धावून आले. त्यांनी घटनास्थळापासून जंगलाच्या दिशेने जावून शेतकऱ्याचा शोध घेतला, परंतु वाघाने त्याला जंगलात घेऊन गेल्याने त्याचा पत्ता लागला नाही. दरम्यान नेरी बिटाचे क्षेत्रसहाय्यक रासेकर यांना या घटनेची माहिती देण्यात आली. वनपरिक्षेत्राधिकारी देऊळकर यांच्या समवेत रासेकर आपल्या सहकाऱ्यासमवेत घटनास्थळी दाखल झाले. तब्बल तीन तासाच्या शोधमोहिमेनंतर जंगलात शेतकरी ईश्वर कुंभारे यांचा मृतदेह आढळून आला.

त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. ते घरचा कर्ता पुरुष होते. त्यांच्या मृत्यूने कुटूंबिय उघड्यावर आले आहे. कुंभारे परिवात शोककळा तर सावरगाव परिसरात प्रचंड भिती पसरली आहे. याच परिसरात काही महिन्यांपूर्वी शेतात काम करणाऱ्या महिलेला वाघाने पंजा मारला होता. मोठ्या शिताफिने त्या महिलेने स्वत:ची सुटका करून घेतली होती. तेव्हापासूनच या परिसरात शेतकरी शेतमजूरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी वारंवार वाघाच्या बंदोबस्ताची मागणी करीत आहेत. परंतु वनविभाग बंदोबस्त करण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळे शेतकरी शेतमजूर व नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. मृतकाच्या कुटूंबियांना तत्काळ आर्थिक मदतीची मागणी नागरिकांनी केली आहे.

Back to top button