Helmet Rule : हेल्मेट न घातल्यास 1 हजारांचा दंड; मनपा कर्मचा-यांना आता सक्ती | पुढारी

Helmet Rule : हेल्मेट न घातल्यास 1 हजारांचा दंड; मनपा कर्मचा-यांना आता सक्ती

अकोला; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत कार्यरत कर्मचा-यांना हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट न घालणा-या कर्मचा-याला एक हजाराचा दंड व तीन महिन्यांसाठी वाहन चालविण्याचा परवाना देखील रद्द करण्यात येणार आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने महापालिका प्रशासनाला कर्मचा-यांना हेल्मेट सक्ती करण्याचे पत्र दिले होते. त्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने कर्मचा-यांसाठी परिपत्रक जारी केले आहे. जिल्ह्यात मोटर सायकलचे होणारे अपघात आणि त्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या पाहता हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालयातील कर्मचा-यांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हीच सक्ती महापालिकेत कार्यरत कायम आस्थापना, कंत्राटी व मानसेवी कर्मचा-यांना करण्यात आली आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या आयुक्त नीला वंजारी यांनी कर्मचा-यांसाठी परिपत्रक प्रसिद्ध केले असून, कर्मचा-यांनी हेल्मेट न वापरल्यास हजार रुपये दंड आकारण्याचा इशारा दिला आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाचे विभागप्रमुख याकडे लक्ष देणार आहेत.

सर्वच कर्मचा-यांना हेल्मेटची सक्ती

अकाेला येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी एक पत्र काढून जिल्ह्यातील सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालयांना आदेश काढून कर्मचा-यांना हेल्मेट सक्तीचे आवाहन करण्यात आले आहे. कर्मचा-यांना हेल्मेट सक्ती करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखांकडे देण्यात आली आहे. ज्या आस्थापनेतील कर्मचा-यांनी हेल्मेट घातले नाही, त्या कर्मचा-याच्या आस्थापना प्रमुखांना त्याकरीता जबाबदार धरण्यात येणार आहे. तसेच नियम भंग करणा-या वाहनधारकाला एक हजारांचा दंड व त्याचा वाहन चालविण्याचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात येणार असल्याचे पत्रात स्पष्टपणे नमुद केले आहे.

Back to top button