दुर्मिळ ‘हायब्रीड’ सूर्यग्रहण २० एप्रिलला, जाणून घ्‍या ग्रहणाचे वैज्ञानिक महत्त्‍व | पुढारी

दुर्मिळ 'हायब्रीड' सूर्यग्रहण २० एप्रिलला, जाणून घ्‍या ग्रहणाचे वैज्ञानिक महत्त्‍व

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : यंदाच्‍या वर्षातील पहिले आणि अतिशय दुर्लभ असे हायब्रीड सूर्यग्रहण २० एप्रिल २०२३ रोजी दिसणार आहे. विशेष म्हणजे हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही, मात्र युट्यूब, टीवी चॅनेल्स आणि इंटरनेटच्या माध्यमातून पाहता येणार आहे. भारताच्या दक्षिण पॅसिफिक महासागरातून हे सूर्यग्रहण दिसेल. कंकणाकृती ग्रहनाला तिथूनच सुरवात होईल. पुढे पाश्चिम आस्ट्रेलियाच्या एक्समाउथ ह्या ठिकाणी ,पापुआंगिनी ,इंडोनेशियाची दक्षिण बेटे येथून मात्र खग्रास ग्रहण दिसेल. उर्वरित इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपीन्स ह्या पूर्व आशियातून हे ग्रहण खंडग्रास दिसेल. ग्रहणाच्या सुरवातीला आणि शेवटी हे ग्रहण कंकणाकृती दिसेल. मध्य काळात हे ग्रहण खग्रास दिसेल, एकाच वेळेस कंकणाकृती आणि खग्रास ग्रहण दिसत असल्यामुळे ह्याला हायब्रीड सूर्यग्रहण असे म्हणतात. दर दशकातून एखाद्या वेळेसच असे दुर्मिळ हायब्रीड सूर्य ग्रहण होत असते आणि शतकात ही शक्यता केवळ ३ % असते.

सूर्यग्रहणाच्या वेळा

हे ग्रहण भारतीय वेळेनुसार ०७.०४.२६ ( UTC- ०१.३४.२६ ) वाजता सकाळी सुरु होईल. खग्रास स्थिती ०९.४६.५३ वाजता तर १२.२९.२२ वा ग्रहण समाप्ती होईल. संपूर्ण ग्रहणात खग्रास स्थिती १.१६ मिनिटे असेल, खंडग्रास स्थिती ३ तास असेल तर संपूर्ण ग्रहण ५ तास २४ मिनिताचे असेल. हे सूर्यग्रहण अश्विनी नक्षत्रात आणि मेष राषीत घडणार आहे.

सूर्यग्रहण कसे घडते ?

सूर्य, चंद्र आणि पृथ्वी जेव्हा एका रेषेत येतात तेव्हा चंद्र आणि सूर्य ग्रहणे घडत असतात. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्य ग्रहणे आणि जेव्हा सूर्य आणि चंद्र ह्यांचेमध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण होते. सूर्य आणि पृथ्वी याच्या मधून चंद्र भ्रमण करताना ५ डिग्रीच्या कोनाने फिरतो त्यामुळे चंद्र- सूर्य ग्रहणे नियमित होत नाही. केवळ चंद्र जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या एका रेषेत येतो त्याच वेळेस ग्रहणे होत असतात.

सूर्य ग्रहणाचे प्रकार

सूर्य ग्रहणाचे साधारणता खंडग्रास, खग्रास आणि कंकणाकृती असे ३ प्रकार मानले जातात,परंतु क्वचित घडणारे हायब्रीड सुर्य ग्रहण हा सुद्धा ४ था प्रकार मानला जातो. खंडग्रास ग्रहणात चंद्र हा सूर्याच्या बिंबाला पूर्णपणे झाकत नाही.0खग्रास ग्रहणात मात्र चंद्रामुळे सूर्याचे बिंब पूर्णपणे झाकल्या जाते. कंकणाकृती सूर्य ग्रहनावेळी चंद्राचे पृथ्वी पासूनचे अंतर थोडे जास्त असते त्यामुळे सूर्य बिंब पूर्णपणे झाकल्या जात नाही. ह्या स्थितीत सूर्याचे बाह्य बिंब हे कंकणाकृती दिसते.

हायब्रीड सूर्यग्रहण कसे घडते ?

हायब्रीड सूर्यग्रहण ही एक दुर्मिळ अवकाशीय घटना आहे.एखाद्या दशकात आखादे वेळी घडणारी ही घटना असते. पृथ्वीच्या गोल आकारामुळे आणि पृथ्वी वरील कमी अधिक उंची / अंतरामुळे एकाच दिवशी कुठे कंकणाकृती तर कुठे खग्रास सूर्यग्रहण पाहावयास मिळते .बहुदा जिथे सूर्य ग्रहण सुर्योदयावेळी आणि समुद्रातून दिसते तेव्हा ही शक्यता असते. समुद्र आणि जमीन ह्यातील उंची मुळे सुद्धा हायब्रीड सूर्यग्रहण दिसते.२० एप्रिल रोजी होणारे सूर्य ग्रहण सकाळी होत आहे ,त्यामुळे सुरवातीला आणि शेवटी कंकणाकृती सूर्य ग्रहण दिसेल तर सूर्य जेव्हा वर येईल तिथून ते खग्रास ग्रहण दिसेल.विशेष म्हणजे २० एप्रिल चे कंकणाकृती सूर्य ग्रहण पॅसिफिक महासागरातून दिसेल तर खग्रास ग्रहण ऑस्‍ट्रेलिया, इंडोनेशिया येथून दिसेल.

ग्रहणाचे वैज्ञानिक महत्त्‍व

ग्रहण ही एक नैसर्गिक खगोलीय घटना असून अशी ग्रहणे सूर्यमालेत दररोज होत असतात.परंतु ग्रहणामुळे अनेक वैद्न्यानिक सत्य शोधण्याची आणि अनुभवण्याची संधी असते.खर तर ग्रहणे ह्या सावल्यांचा खेळ आहे,परंतु ह्या निमित्ताने सूर्य,चंद्र पृथ्वी केव्हा आणि कशी एका रेषेत येतात हे कळते,सूर्य-चंद्र एका रेषेत आल्यास गुरुत्व बलाचा किती परिणाम होतो हे अभ्यासता येते , खग्रास स्थितीत सूर्याचा कोरोना ,सौरज्वाळा ह्याचा अभ्यास करता येतो, ताऱ्याची स्थिती आणि प्रकाष किरणांची वक्रता अभ्यासता येते. विशेषता सूर्यग्रहणाचा खरोखर मानवावर,सजीवावर शारीरिक,मानसिक परिणाम होतो का ह्याची पडताळली / शोध करण्याची ही संधी असते. अचानक होणार्‍या अंधारामुळे सजीव कसे वागतात ह्याचा अभ्यास करण्याची पण संधी असते. आपल्याकडे २० एप्रिलला ग्रहण दिसत नसल्याने ही संधी आपल्याकडे नाही ,मात्र पुढील ग्रहनावेळी मात्र हे प्रयोग करावे.

भारतातून २०२३ मध्ये दिसणारी ग्रहणे

२०२३ मध्ये एकूण चार ग्रहणे होणार आहेत त्यामध्‍ये दोन चंद्र तर दोन सूर्य ग्रहणांचा समावेश आहे.

१) २० एप्रिल- हायब्रीड सूर्य ग्रहण, हे भारतात दिसणार नाही

२) ५-६ मे छायाकल्प चंद्रग्रहण ( भारतात दिसेल)

३ )१४ ऑक्टोबर कंकणाकृती सूर्यग्रहण ( भारतातून दिसणार नाही )

४) २८-२९ ऑक्टोबर खंडग्रास चंद्रग्रहण ( भारतात दिसेल)

ग्रहण सावल्यांचा खेळ : प्रा. सुरेश चोपणे

ग्रहण हा सावल्यांचा खेळ आहे. दररोज होणारी रात्र हा पण एकप्रकारे ग्रहणाचाच प्रकार असतो. ग्रहणात तर केवळ थोडेच मीनिटे अंधार पडतो, पशु -पक्षांना ग्रह, राशी-भविष्याचा जर काही फरक पडत नाही तर केवळ माणसांनाच का ? कारण हे सर्व आपण निर्माण केलेले तर्क वितर्क आहेत. त्यामुळे सर्वांनी अशा खगोलीय घटनांचा आनंद घ्यावा, असे आवाहन स्काय वाच ग्रुप तर्फे करण्यात येते, असे प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

Back to top button