यवतमाळ : अवैध गर्भपाताची माहिती देणाऱ्या आशा, अंगणवाडी सेविकांना मिळणार २ लाखांचे बक्षीस | पुढारी

यवतमाळ : अवैध गर्भपाताची माहिती देणाऱ्या आशा, अंगणवाडी सेविकांना मिळणार २ लाखांचे बक्षीस

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : अवैध गर्भपाताची माहिती देणाऱ्या आशा, अंगणवाडी सेविकांना आता २ लाख रूपये मिळणार आहेत. जिल्ह्यात लिंग गुणोत्तर प्रमाण ९८० असले तरी पुसद व घाटंजी तालुक्यात हे प्रमाण ८७८ एवढे कमी आहे. ही बाब चिंताजनक असल्याने जिल्ह्यात अवैध गर्भपाताबाबत माहिती देणा-या आशा व अंगणवाडी सेविकांना शासनाच्या एक लाख रुपयांसोबतच जिल्हा प्रशासनाकडूनही १ लाख रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी येडगे यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. गर्भपात केंद्रामध्ये अवैधरित्या गर्भपात केला असेल किंवा अपात्र व्यक्ती गर्भपात करीत असेल तर त्याबाबतची माहिती देणाऱ्यास शासनाकडून एक लाख रुपयाचे बक्षीस दिले जाते. यामध्ये जिल्हाधिकारी यांनी भर घालत अवैध गर्भपाताची माहिती देणाऱ्या आशा व अंगणवाडी सेविकांना जिल्हा प्रशासनाकडून आणखी एक लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. म्हणजे आशा व अंगणवाडी सेविकांनी अवैध गर्भपाताची माहिती दिल्यास शासनाकडून १ लाख व प्रशासनाकडून १ लाख असे २ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. शिवाय त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. तक्रारीसाठी १८००२३३४४७५ हा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button