पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील मोठे बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे यांच्या सर्व कार्यालयावर बुधवारी सकाळी एकाचवेळी सहा ठिकाणी प्राप्तीकर विभागाने छापा मारला. या कारवाई नंतर बांधकाम व्यावसायिक तसेच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. प्राप्तीकर विभागाने देशपांडे यांच्या फर्ग्युसन रोडवरील कार्यालयावर तसेच निवासस्थानी मोठ्या पोलिस बंदोबस्तात छापे टाकले. या कारवाईत आयकर विभागाच्या पथकाने महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्राॅनिक साधने व संगणकाच्या हार्डडिस्क जप्त केल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.
डेक्कन जिमखाना भागातील फर्ग्युसन रस्त्यावर देशपांडे यांची सिटी काॅर्पोरेशन लिमिटेड बांधकाम कंपनी व हडपसर भागातील अमानोरा पार्क परिसरातील कार्यालयावर बुधवारी दिवसा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बुधवारी पहाटे आयकर विभागाचे वेगवेगळे दहा पथक २० ते २२ खासगी वाहनातून पुण्यात दाखल होऊन छापेमारी केली. आयकर विभागाने मंगळवारी 'बीबीसी' वृत्तसंस्थेच्या दिल्लीतील कार्यालयात छापे टाकले. बांधकाम व्यावसायिक देशपांडे यांचे पुण्यातील कार्यालय आणि निवासस्थानी कारवाई करण्यात आली.