Online fraud : भाईंदर पूर्व येथील महिलेला फेसबुकद्वारे मैत्री पडली ८ लाखांना | पुढारी

Online fraud : भाईंदर पूर्व येथील महिलेला फेसबुकद्वारे मैत्री पडली ८ लाखांना

मिरारोड : पुढारी वृत्तसेवा भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्ट परिसरात राहणाऱ्या एका (५२ वर्षीय) महिलेबरोबर फेसबुकद्वारे मैत्री करून फेसबुक खातेधारक अनोळखी व्यक्तीने त्या महिलेचा विश्वास संपादन केला. यानंतर त्या महिलेची आर्थिक गरज लक्षात घेऊन तिला अर्थिक मदत करण्याचा बहाणा करून संबंधीत महिलेची ८ लाखांची ऑनलाईन (Online fraud) फसवणूक केली आहे. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नर्मदा (नाव बदलेले) भाईंदर पूर्व या ठिकाणी राहत आहेत. त्यांना डॉ. रेयॉन रोलंड नावाच्या अनोळखी व्यक्‍तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर काही दिवसांनी अनोळखी व्यक्ती मैत्री करून मॅसेज पाठवून चॅटींग करु लागला. (Online fraud) त्‍यानंतर त्‍या महिलेशी त्‍याने व्हाट्सॲपवरून चॅटींग करण्यास सुरूवात केली. त्‍या अनोळखी व्यक्‍तीने महिलेचा विश्वास संपादन करून सर्व माहिती विचारली. त्‍यावेळी त्या महिलेने पैशाची अडचण असल्याचे सांगितले. त्‍यानंतर त्‍या अनोळखी व्यक्‍तीने तो डॉक्‍टर असल्‍याचे सांगून आमच्यात चांगली मैत्री झाली असल्‍याने मला आर्थिक मदत करतो असे सांगितले.

त्‍याने महिलेला पैसे पाठविण्यासाठी खाते क्रमांकाची माहिती घेतली. त्‍यानंतर त्‍या अनोळखी व्यक्‍तीने त्‍या महिलेच्या व्हॉट्सॲपवर ८० हजार पाँड ट्रान्सफर झाल्याचा व्हॉट्सॲप मॅसेज पाठवून पैसे ट्रान्सफर केले असल्‍याची सांगितले. प्रोसेसिंग फी म्हणून ३० हजार रुपये खर्च येईल अशी माहिती देवून त्याने दिलेल्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने दिलेल्या खात्यावर ती महिला वेळोवेळी पैसे पाठवत राहिल्‍या. (Online fraud) त्‍यांनी त्‍या अनोळखी व्यक्‍तीच्या खात्‍यावर तब्बल ८ लाख रूपये पाठवले. त्‍यानंतर त्‍यांना आपली फसवणूक झाल्‍याचे कळले.

दागिने गहाण ठेवून भरले पैसे 

त्या अनोळखी व्यक्तीने वारंवार पैशाची मागणी केल्यामुळे त्या महिलेने त्यांच्या घरात असलेले सोन्याचे दागिने गहाण ठेवून पैसे ट्रान्सफर केले. (Online fraud) त्यानंतरही ती अनोळखी व्यक्ती हा त्याचे व्हॉट्सअॅप चॅटींग करून परदेशातून बेकायदेशीर पैसे ट्रान्सफर करत असल्याची पोलीसांना माहिती देईल, असे सांगून आपल्‍याला सहा लाख पन्नास हजार रुपये पाठविण्यास सांगितले. यावरून त्या अनोळखी व्यक्तीने आपली फसवणूक केली आहे, असे महिलेच्या लक्षात आले. त्या अनोळखी व्यक्तीने ऑगस्ट २०२२ ते १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत वेळोवेळी त्याने दिलेल्या त्याच्या वेगवेगळ्या खात्यावर ८०, १५०१ रुपयाची फसवणूक केली आहे. त्यामुळे संबंधीत अनोळखी व्यक्ती विरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम, ६६ (सी), ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :  

Back to top button