बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह २५ जणांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने आज (दि. १५) सशर्त जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी १५ हजाराचा जातमुचलका भरणे, एक महिना बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला नियमित हजेरी लावणे, रक्ताच्या नात्यातील दोन व्यक्तींचे मोबाईल नंबर व त्यांच्याआधारकार्डची प्रत पोलीस स्टेशनमध्ये जमा करणे, अशी आंदोलने व गुन्ह्यांपासून पुढील काळात परावृत्त राहणे आणि पोलीसांना तपासात सहकार्य करणे अशा अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
सोयाबीन व कपाशीचे भाव तात्काळ वाढवा, पीकविम्याचे पैसे तातडीने जमा करा अन्यथा आम्हाला बंदूकीच्या गोळ्या घाला असा आक्रमक पवित्रा घेत तुपकर यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीसांची वर्दी घालून व त्यावर डिझेल टाकून आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. पोलीसांनी तुपकर यांच्यासह २५ जणांना अटक केली होती व अजामिनपात्र गुन्हे दाखल केले होते. न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर या सर्वांची रवानगी अकोला जिल्हा कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर तुपकर यांच्या पत्नी एड. शर्वरी तुपकर यांनी या २५ जणांच्या जामीनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने तुपकर यांच्यासह २५ जणांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.
हेही वाचा :