परभणी : धाकट्या मुलीने दिला आईच्या पार्थिवाला मुखाग्नी! | पुढारी

परभणी : धाकट्या मुलीने दिला आईच्या पार्थिवाला मुखाग्नी!

जिंतूर ; पुढारी वृत्‍तसेवा : आज शिकलेली माणसं सुद्धा जुन्या प्रथा परंपरांना सोडायला तयार नाहीत. विज्ञान- तंत्रज्ञानाच्या युगात नवेपण स्वीकारून, जुन्याचं चांगुलपण जपत काळानुसार आपण बदललंच पाहिजे. जुन्या रूढी-परंपरांना मूठ-माती देत मुलीनेच मुखाग्नी देत सर्व विधी पार पाडले. शिकून शहाणपण काय असतं! प्रत्यक्षात व्यवहारिक जगात कसं जगायचं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मावशी निनाताई कैलासराव जाधव यांची कृती. आईला मुखाग्नी देण्याचा पुढाकार. आजच्या पुरुषसत्ताक पद्धतीत मुलगा नाही म्हणणाऱ्या लोकांना त्यांनी आपल्या कृतीतून सणसणीत उत्तर दिलं.

या विषयी अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी म्हणजे शनिवारी दि.११ रोजी आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या आजी रुक्मिणीबाई शेजुळ – सूर्यवंशी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची लेक मातृहृदयी सौ. मीनाताई रामप्रसाद बोर्डीकर यांनी आईची सेवा केली.

रुक्मिणीबाई शेजुळ – सूर्यवंशी यांची दोन्ही मुलं वारल्याने मुखाग्नी कोण देणार? अशी चर्चा सुरू झाली. असं असताना माजी मंत्री ॲड. गणेशराव दुधगावकर यांच्या धाकटी भगिनी व आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मावशी निनाताई कैलासराव जाधव या मुखाग्नी देण्यासाठी पुढे आल्या.

अंत्ययात्रा निघताना पाणी, ताट घेऊन निनाताई कैलासराव जाधव अंत्ययात्रेसोबत स्मशानाकडे निघाल्या. त्या ठिकाणी संपूर्ण मराठवाड्यातून आलेली आप्त मंडळी, नातेवाईक यांच्यासमोर आपल्या आईला रुख्मिणीबाई शेजुळ – सुर्यवंशी यांच्या पार्थिवाला त्‍यांनी अग्नी दिला.

या घटनेमुळे गावात व आजूबाजूच्या परिसरात या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. संपत्ती, पैसा, घर, शेती यांचा उत्तराधिकारी पुरुष अशी असा समज मोडीत काढत या रुक्मिणीबाई शेजुळ यांच्या लेकिंनी आज नवा आदर्श निर्माण केला आहे. मुलांपेक्षा मुली कमी नाहीत – मुलगा नसेल तर मोक्ष प्राप्त होत नाही, पाणी कोण पाजणार? मुलाने मुखाग्नी दिला तरच उद्धार होतो, असे अनेक गैरसमज ग्रामीण भागात आहेत. याला छेद देत या दोन्ही मुलींनी आईचे अंत्यसंस्कार केले. परंपरेची बंधन झुगारून धाडस दाखवणाऱ्या जाधव व बोर्डीकर बहिणीचे कौतुक होत आहे. तसेच मुलापेक्षा मुलगी देखील काही कमी नाही हे दाखवून देत सर्व जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button