बुलढाणा : रविकांत तुपकरांचे आत्मदहन आंदोलन; शंभर जणांना अटक | पुढारी

बुलढाणा : रविकांत तुपकरांचे आत्मदहन आंदोलन; शंभर जणांना अटक

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : आत्मदहन आंदोलनाचा प्रयत्न केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह शंभरावर कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कापूस व सोयाबीनला योग्य भाव द्या आणि पीकविम्याचे पैसे जमा करा या मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

‘आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा आमच्यावर गोळीबार करा, पण आता मागे हटणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत तुपकर यांनी मागील आठवड्यात आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला होता. मागण्या मान्य न झाल्यास ११ फेब्रूवारीला स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण आत्मदहन आंदोलन करू अशी वेळ ही जाहीर केली होती.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शनिवारी (दि. ११) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा बंदोबस्त ठेवला होता. खबरदारीची उपाययोजना केली होती. दुपारी १ वाजता रविकांत तुपकर हे पोलीसांसारखा गणवेश परिधान करून व येण्यापूर्वीच आपल्या अंगावर डिझेल शिंपडून आले होते. शंभरावर कार्यकर्त्यांचा मोर्चा घेऊन तुपकर हे आंदोलनस्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अडवले व आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर थोपवण्यात आल्यानंतर तुपकर यांनी कार्यकर्त्यांसमोर जाहीर भाषण करून आंदोलनाची भूमिका मांडली. त्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीकविम्याच्या नुकसानभरपाई विषयी वस्तूस्थिती मांडली व उर्वरित शेतक-यांच्या पीकविम्याच्या रकमा त्यांच्या बँक खात्यात जमा करणे सुरू झाल्याचे सांगितले. अडीच तास गोंधळाची व तणावाची स्थिती झाली होती. अखेर आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले व पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसण्याचे पोलिस अधिका-यांनी आवाहन केले व आंदोलन थांबवण्याची विनंती केली. पण आंदोलनकर्ते हे मागण्या मान्य होईपर्यंत जागेवरून न हटण्याच्या भुमिकेवर ठाम होते. तळपत्या उन्हात सकाळपासून खडा पहारा देत असलेले पोलीस तंग आले होते. तसेच “सरकार हमसे डरती है, पुलीस को आगे करती है” अशा आंदोलकांनी घोषणा सुरू केल्या. अखेर पोलिसांनी आंदोलकांना व्हॅनमध्ये बसण्यास सक्तीने सांगितले. जे व्हॅनमध्ये बसायला तयार नव्हते आणि जागेवरून हटत नव्हते अशा कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. तुपकर यांचेसह कार्यकर्त्यांना स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button