न्यूयॉर्क ः भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत चार युद्धे झालेली आहे. त्यावरून या दोन्ही देशांमधील सीमा किती तणावाच्या छायेखाली असेल याची आपण कल्पना करू शकतो. मात्र, हीच बॉर्डर अंतराळातून मात्र शानदार दिसते. पृथ्वीच्या कक्षेत भ—मण करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून रात्रीच्या झगमगाटात भारत-पाक सीमेचे छायाचित्र टिपण्यात आले.
अंतराळ स्थानकावरून तेथील अंतराळवीर पृथ्वीची अनेक छायाचित्रे टिपत असतात. अशीच काही छायाचित्रे इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहेत. त्यामध्येच भारत-पाक सीमेचे हे छायाचित्रही आहे. भारतीय भूमी प्रकाशाने उजळलेलीही यामधून दिसून येते. अंतराळ स्थानकाने एकूण चार छायाचित्रे शेअर केली आहेत.
त्यामध्ये आपल्या निळाशार ग्रहाचे खुललेले रूपडेही दिसते. भारत-पाक सीमेवरील छायाचित्रात एक नारंगी रंगाची पट्टी दिसते. ही पट्टी सीमेवरील सिक्युरिटी लाईटची आहे. भारत-पाक सीमा ही जगातील काही निवडक अशा सीमांपैकी एक आहे जी अंधारातही स्पष्ट दिसते! अन्य छायाचित्रांमध्ये इंग्लंड, नेदरलँडस्, बेल्जियम व फ्रान्स दिसून येतात.