Yavatmal Crime : प्रियकराकडून प्रेयसीच्या पतीचा खून | पुढारी

Yavatmal Crime : प्रियकराकडून प्रेयसीच्या पतीचा खून

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : Yavatmal Crime : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या प्रेयसीच्या पतीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी वणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. वणी तालुक्यातील बोर्डा फुलोरा तलावाजवळ घडलेल्या या घटनेत मारेकर्‍यांनी खून केल्यानंतर आत्महत्येचा बनाव निर्माण केला होता. वणी पोलिसांनी या प्रकरणात खोलवर तपास करून २० दिवसानंतर मारेकर्‍यांना बेड्या ठोकल्या.

निलेश सुधाकर चौधरी (वय ३२) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणात चंद्रशेखर दुर्गे (३२) आशिष पिदुरकर (२५) गौरव दोरखंडे (२२) योगेश उघडे (२०) या चौघांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण वणी तालुक्यातील रासा येथील रहिवासी आहे.

२७ ऑगस्टला निलेश चौधरी हा घरून बेपत्ता झाला होता. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र पुढील तीन दिवस त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. शोध सुरू असतानाच २९ ऑगस्टला रासा लगतच्या फुलोरा जंगलात त्याचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

घटनास्थळावरील एकूण परिस्थिती लक्षात घेता हा खूनच असावा असा अंदाज पोलिसांनी लावला. (Yavatmal Crime) वणी पोलिस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार शाम सोनटक्के यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला.

४० पेक्षा अधिक जणांचे जबाब नोंदविण्यात आले. शवविच्छेदन अहवालाचाही अभ्यास करण्यात आला. बुधवारी या प्रकरणात चंद्रशेखर दुर्गे, आशिष पिदुरकर गौरव दोरखंडे व योगेश उघडे या चौघांना ताब्यात घेण्यात आले.

दारू पाजून आवळला गळा…

यातील मुख्य आरोपी चंद्रशेखर दुर्गे याचे मृत निलेशच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. निलेश नेहमी अडसर ठरत होता. शेखरने कायमचा अडथळा दूर करण्यासाठी निलेशचा काटा काढण्याची योजना आखली आणि तीन मित्रांच्या मदतीने त्याला रासा लगतच्या फुलोरा जंगलात बोलविले. येथे त्याला येथेच्छ दारू पाजली. त्यानंतर दोरीने गळा आवळून त्याची हत्या केली. आत्महत्येचा बनाव करण्यासाठी निलेशचा मृतदेह बाजूला असलेल्या एका काटेरी झुडपात नेऊन फेकण्यात आला.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : एक एकर टोमॅटो शेतीसाठी खर्च किती आणि हातात मिळतात किती ?

Back to top button