चंद्रपूर : वनक्षेत्रातील कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऊर्जा विभागाला आदेश | पुढारी

चंद्रपूर : वनक्षेत्रातील कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऊर्जा विभागाला आदेश

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यात वनक्षेत्रातील गावांमध्ये शेतकऱ्यांवरील वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे वनक्षेत्रातील कृषी पंपांना सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीज पुरवठा करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. ऊर्जा विभागाला याबाबतचे निर्देश दिले असून लवकरच आदेश निर्गमीत करण्यात येणार आहे, अशी माहिती चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी दिली.

चंद्रपूर जिल्ह्यात मानव व वन्यप्राण्यांमध्ये संघर्ष वाढला आहे. शेतांमध्ये कामाला गेलेल्या अनेक शेतकऱ्यांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला आहे. वन्यप्राण्यांचा धोका असतानाही शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतावर जातात. रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या जीवितास धोका असल्याने कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत चंद्रपूर जिल्ह्यात दिवसातील भारनियमन रद्द करून वनक्षेत्रातील कृषीपंपांना दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतला आहे.

आता सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच वीज पुरवठा करण्यात येणार आहे. फडणवीस यांनी कार्यवाहीचे निर्देश ऊर्जा विभागाला दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता रात्री शेतावर जावे लागणार नाही. यामुळे मानव व वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष कमी होण्यास मदत होईल, असे आमदार भांगडिया यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button