‘भारत जोडो’चा संदेश राज्यभर पोहोचवू : आ. बाळासाहेब थोरात | पुढारी

‘भारत जोडो’चा संदेश राज्यभर पोहोचवू : आ. बाळासाहेब थोरात

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संविधान बचाव व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घेऊन कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत निघालेल्या खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे राज्यभर उत्स्फूर्त स्वागत होत आहे, असे सांगत, ‘भारत जोडो’चा संदेश राज्यभर पोहोचविणार असल्याचा विश्वास काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व भारत जोडो यात्रेचे समन्वयक माजी महसूल मंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मराठवाडा व विदर्भात फिरणार आहे. यानिमित्ताने हिंगोलीत माध्यमांशी आ. थोरात बोलत होते.

यावेळी आ. डॉ. प्रज्ञाताई सातव, माजी उपाध्यक्ष मोहन जोशी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, युवक काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे आदी उपस्थित होते. आ. थोरात म्हणाले, सध्या देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी याबद्दल कोणतेही सरकार बोलायला
तयार नाही. शेतकरी, कष्टकरी समाजाच्या प्रश्नांबाबत सरकार बोलत नाही. धार्मिक मुद्यांवर राजकारण केले जात आहे. याउलट काँग्रेसच्या वतीने खा. राहुल गांधींसह काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढत आहे. दलित, मागासवर्गीय, शेतकरी, कष्टकर्‍यांच्या समस्या ऐकून घेत राहुल गांधी त्यांना आधार देत असल्याचे आ. थोरात म्हणाले.

काटेकोर नियोजन!
काँग्रेसचे युवा नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा नांदेड, हिंगोली व अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांमधून जात आहे. या यात्रेच्या नियोजनाची काटेकोर पाहणी आ. थोरात करीत आहेत. प्रभारी एच.के.पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे व काँग्रेस नेते सहभागी आहेत.

 

Back to top button