गोवा : कर्नाटक भवनासाठी राज्यात जागा नाही – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत | पुढारी

गोवा : कर्नाटक भवनासाठी राज्यात जागा नाही - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  कर्नाटक सरकारने गोव्यात कर्नाटक भवन बांधण्यासाठी सरकारकडे जागा मागितली आहे. मात्र, गोव्यात जागेची मोठी कमतरता आहे. सरकारकडेही जागा उपलब्ध नाही. त्यामुळे कर्नाटक सरकारला गोव्यात कर्नाटक भवन बांधण्यासाठी जागा देऊ शकत नाही, असा खुलासा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवार, दि.13 रोजी केला आहे. कर्मभूमी कन्नड संघ डिचोली, कन्नड सांस्कृतिक विभाग बेंगलोर, कर्नाटक जागृती वेदिकातर्फे झांटये सभागृहात आयोजित चौदाच्या कन्नड बांधव सांस्कृतिक संमेलनाच्या उद्घाटनसमयी ते बोलत होते.

यावेळी स्वामी चंद्रशेखर शिवाचार्य, मंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार मायकल लोबो, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, माजी सभापती राजेश पाटणेकर, नगराध्यक्ष कुंदन फळारी, हनुमंतप्पा रेड्डी, भगवान हरमलकर, संमेलन अध्यक्ष डॉ. सतीशकुमार होसमनी, महेश बाबू सुर्वे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की गोव्यात कर्नाटक भवन बांधण्यास आपला विरोध नाही. मात्र, त्यांनी सरकारकडे जागेची अपेक्षा न करता स्वतः जागा विकत घेऊन कर्नाटक भवन बांधावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कर्नाटक सरकारने कर्नाटक भवनासाठी गोवा सरकारकडे जागा मागितल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरील खुलासा केला.

गोव्यातील कन्नड भाषिक संघटनांंनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना निवेदन देऊन गोव्यात कन्नड भवन बांधण्याची मागणी केल्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कन्नड भवनासाठी 20 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती.

Back to top button