पुणे : जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया | पुढारी

पुणे : जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. आव्हाड यांच्यावर 72 तासात दोन गुन्हे दाखल झाल्याने कंटाळून आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. यावर राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांना पहिल्यांदा विनंती आहे की त्यांनी राजीनामा देऊ नये. ज्या शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो त्या शरद पवारांनी अनेक चढ उतार पाहिलेत, अनेक स्थित्यंतर पाहिलेत.

शिंदे-फडणवीस सरकारचे चुकीचे काम सुरू आहे. थिएटरमध्ये ज्याला मारहाण झाली म्हणून गुन्हा दाखल केला, त्यांनेच आव्हाडांनी वाचवल्याचे सांगितले. ज्या कार्यक्रमात धक्काबुक्की झाली म्हणून आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तो कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आव्हाडांच्या मतदार संघात होता. आमदार म्हणून कार्यक्रमाला जावे लागते.

प्रमुख नेत्यांसाठी अनेकवेळा आम्हा लोकांना बाजूला करावे लागते, त्यांच्या पाठीमागे आपली गाडी जावी यासाठी धावपळ करावी लागते, तसेच आव्हाड मुख्यमंत्र्यांसाठी इतरांना बाजूला व्हा म्हणत होते. मात्र, त्यांच्यावर कारण नसताना विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवे, तेथे असे काही घडलेलं नाही. ते राज्याचे प्रमुख आहेत, सत्ता येते जाते, कोणी तांब्रपट घेवून जन्माला येत नाही. त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा भ्याड आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी लक्ष घालावे. चार दिवस सासूचे‌चार दिवस सुनेचे असतात.

कारण नसताना गुन्हा दाखल
आव्हाड सर्व धर्म समभावाने आणि संविधानानुसार वागतात. वैचारीक मतभेद असू शकतात, मात्र अशा प्रकारे घडू लागले तर राज्याची‌ संस्कृती लयाला जाईल. त्यामुळे आव्हाडांवर गुन्हा मागे घेण्याची आमची मागणी आहे. आव्हाड यांच्यारील गुन्ह्याचे भाजप नेते समर्थन करत असल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, यात कुणी राजकारण करू नये. कोणी लोक प्रतिनिधीला बदनाम करण्याचे काम कोणी करत असेल तर जनतेने या गोष्टीकडे निट पाहिले पाहिजे, सरकारनेही यात लक्ष घालावे.

राज्यात आलिकडे गल्लीच्छ प्रकार घडत आहेत. बैलगाडा शर्यतीत गोळीबार होतो, ही कायदा व सुव्यवस्था आहे का? सरकारचा दरारा असने गरजेचे आहे, मात्र तसे दिसत नाही. शिंदे सरकार पूर्वीच्या सरकारच्या नावाने किती दिवस खडे फोडणार आहेत. प्रकल्प बाहेर जात आहे, बेरोजगारी वाढत आहे, यावरून लक्ष विचलीत करण्यासाठी सर्व सुरू आहे.

Back to top button