यवतमाळ : पत्नीच्या छळप्रकरणी पीएसआयला कारावासाची शिक्षा | पुढारी

यवतमाळ : पत्नीच्या छळप्रकरणी पीएसआयला कारावासाची शिक्षा

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा: पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने पोलीस उपनिरीक्षकाला (पीएसआय)  एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. यवतमाळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. भारत उत्तमराव लसंते असे शिक्षा झालेल्‍या पीएसआयचे नाव आहे. तो अमरावती येथे पोलीस दलात कार्यरत आहे.

तू दिसायला चांगली नाहीस, मी दुसरीकडे लग्न केले असते तर, 15,20 लाख रूपये हुंडा मिळाला असता, असे वारंवार म्हणत माझे कोणीही काही करू शकत नाही. माहेरहून पाच लाख रुपये आणून दे, तरच तुला नांदवितो. नाहीतर तुला जीवे मारून टाकतो, अशी धमकीही लसंते याने पत्‍नी मोनिका यांना  दिली होती.  शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून मोनिका यांनी  पती भारत उत्तमराव लसंते, सासरा उत्तमराव गोमाजी लासंते, सासू रेखा उत्तमराव लसंते आणि विजय विलास लसंते (सर्व रा.विसावा कॉलनी, बालाजी पार्क, पिंपळगाव, यवतमाळ) यांच्याविरुद्ध  मोनिका यांनी वसंतनगर पोलिसांत फिर्याद दिली. यानुसार संबंधितांवर गुन्‍हा दाखल झाला होता.

पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण गायकवाड यांनी तपासाअंती येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सहायक सरकारी अभियोक्ता चंद्रकांत ऊके यांनी फिर्यादी पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासले. पुराव्यावरून आरोपीविरुद्ध कलम ४९८ व कलम ३२३ नुसार गुन्हा सिद्ध झाला. सत्र न्यायालयाने आरोपी भारत लसंते याला एक वर्षाची सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास एक महिना साध्या शिक्षेची कैद, कलम ३२३ नुसार सहा महिने सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा :

 

Back to top button