चंद्रपूर: रेल्वेच्या धडकेत पट्टेदार वाघाचा मृत्यू | पुढारी

चंद्रपूर: रेल्वेच्या धडकेत पट्टेदार वाघाचा मृत्यू

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे रूळावरून मार्गक्रमण करताना एका ३ वर्षीय नर जातीच्या पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२१) पहाटेच्या सुमारास दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर राजूरा तालुक्यातील राखीव वनातील चुनाळाजवळ घडली. वनाधिऱ्यांनी पट्टेदार वाघाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करून दफन केला. काल बल्लापूर तालुक्यात एका पट्टेदार वाघाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पाऊणेआठच्या सुमारास एका पट्टेदार वाघाचा मृतदेह दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर राजूरा तालुक्यातील कक्ष 158 मध्ये राखीव वनातील चुनाळा जवळ पोल नंबर 144/31 मध्ये पडून असल्याची माहिती राजूरा वनविभागाला प्राप्त झाली.

तत्काळ राजूरा वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी येलकेडवाड यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. लगेच घटनेची माहिती मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपविभागीय वनाधिकारी अमोल गर्कल, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे प्रतिनिधी बंडू धोतरे, पीसीसीएफ वाईल्ड लाईफचे प्रतिनिधी मुकेश भांदककर यांनी घटनास्थळी जावून प्रत्यक्ष घटनेची पाहणी केली.

त्यानंतर पशुधन विकास अधिकारी डॉ. नरसिंग तेलंगे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जेल्लेवार यांना पाचारण करण्यात आले. तीन वर्षीय नर जातीच्या वाघाचा मृत्यू पहाटेच्या सुमारास रेल्वेरूळावरून मार्गक्रमण करताना रेल्वेच्या धडकेत झाल्याचा निष्कर्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. शासकीय नियमानुसार घटनास्थळी मृतावस्थेत आढळून आलेल्या वाघाचा पंचनामा आणि मृतदेहाचे शवविच्छेदन करून दफन करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button