देवेंद्र फडणवीस म्हणाले, बेळगावात संजय राऊंतांच्या अहंकाराचा पराभव | पुढारी

देवेंद्र फडणवीस म्हणाले, बेळगावात संजय राऊंतांच्या अहंकाराचा पराभव

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : गोवा विधानसभा निवडणूक प्रभारी केल्याबद्दल जे. पी. नड्डा यांचे आभार मानतानाच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात गोव्यात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार स्थापन करू, असा विश्वास विरोधी पक्षनेते व गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

विशेषत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उत्तम कार्य केले. त्यांनी केलेल्या विकास कामांच्या आधारावर निवडून येऊ. गेली चार निवडणूका सातत्याने गोव्यात जात असल्याने गोव्याचा चांगला परिचय आहे. महाराष्ट्र नेहमीच गोव्याच्या पाठीशी उभा राहिलाय. आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी नेहमी गोव्याच्या निवडणुकीत सक्रिय राहिलेली आहे. त्यामुळे संपूर्ण मदत राहिल. अमित शाह, राजनाथ सिंग, नितीन गडकरी यांच्यासह दोन केंद्रीय राज्यमंत्रीही सोबत आहेत. आम्ही आमच्या परीने पूर्ण मेहनत करून गोव्यात भाजपाचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करू. पहिल्यांदा केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून त्यांच्या अपेक्षा समजून घेईन नंतर मग काम सुरू करीन, असे फडणवीस म्हणाले.

संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव

बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही. कारण मराठी माणूस पराभूतच होऊ शकत नाही. बेळगावमध्ये संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव झालेला आहे. भाजपाच्या निवडून आलेल्या नगर सेवकांमध्ये १५ पेक्षा जास्त मराठी नगर सेवक आहे. त्यामुळे मराठी माणसाचा पराभव आणि एका पक्षाचा पराभव या दोन गोष्टी सारख्या असू शकत नाही असा टोला फडणवीस यांनी संजय राऊत यांना हाणला.

बेळगाव महापालिका निवडणूक निकालानंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना संताप व्यक्त केला होता. बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी शेकडो मराठी माणसं मेली. महाराष्ट्रातील ६९ लोकं मेली. बाळासाहेब तुरुंगात गेले. अन् तुम्ही पेढे वाटता.. मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत नाही तुम्हाला. राजकारण बाजूला ठेवा. जल्लोष करताना आणि पेढे वाटताना मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला होता त्याला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.

सचिन वाझे प्रकरणातील घटनाक्रम सरकारला धक्का देणारा

सचिन वाझे प्रकरणी एनआयएने दाखल केलेल्या चार्जशीटमधील सगळ्या गोष्टी माझ्यापर्यत पोहोचलेल्या नाही. मी अजून त्याचा अभ्यास केलेला नाही. पण यातील घटनाक्रम सरकारला धक्का देणारा आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये पोलिसातील अधिकारी अशा प्रकारची घटना करू शकतात यापेक्षा अजून धक्कादायक काय असू शकते.

यूपीत संपूर्ण समाज पाठीशी

यूपीमध्ये सपा व बसपा ब्राम्हण संमेलने घेत आहेत. त्याचा फारसा परिणाम होणार नाही. संपूर्ण समाजाला सोबत घेऊन भाजपाने काम केले आहे. काेणी काेणत्याही समाजाला गळाला लावण्याचा प्रयत्न केला तरी सारे समाज भाजपासोबत राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रामदास तडस यांच्या कौटुंबिक वादाबद्दल त्यांच्याशी बोललाे. त्यांचा मुलगा व सूनेचा नोंदणी पद्धतीने विवाह झाला होता. त्यातून काही गैरसमज होऊन दुरावा निर्माण झाला आहे. सर्व गोष्टी समन्वयाने व्हाव्या आणि कायद्याचा कुठेही अवमान होऊ नये याची दक्षता घेण्याची सूचना तडस यांनी केली.

राणेंचा सहभाग नाकारू शकत नाही

चिपी विमानतळ तयार करण्यात राणेंचा सहभाग कोणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या पुढाकारानेच चिपी विमानतळाचे काम सुरू झाले. नंतर मी मुख्यमंत्री असताना काम पूर्ण केले व त्याचे एक उद्घाटनही केले. आता तिथून विमानोड्डाण होणार आहे. खऱ्या अर्थाने काेकणच्या विकासाला चालना मिळणार आहे. अशा परिस्थितीत वाद न करता समन्वयाने काम केले पाहिजे. राज्य व केंद्राने समन्वयाने काम करायचे असते. श्रेयाचा वाद नाही, असे फडणवीस म्हणाले.

हे ही वाचलत का :

कोल्हापुरातील पांडवकालीन सातेरी महादेव मंदिर

Back to top button