

भुसावळ तालुक्यात असलेल्या हातनूर धरणाचे संपूर्ण ४१ दरवाजे उघडण्यात आले. धरणातून सध्या ८२ हजार ७७८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तापी पूर्णा नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे.
तापी आणि पूर्णा नदीच्या उगम क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने हातनूर धरणात पाण्याची मोठी आवक येत आहे. मध्य प्रदेशातील बैतुल येथून तापी नदीचा उगम होत असून मध्य प्रदेशात झालेल्या जोरदार पावसामुळे तापीला पूर आलेला आहे. तर विदर्भातील पूर्णा नदीच्या उगमस्थान क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे अमरावती अकोला शेगाव बुलढाणा या ठिकाणी वाहतुकीचे पुल पाण्याखाली गेलेले आहे. या दोन्ही नद्यांचा संगम मुक्ताईनगर येथे होतो.
या दोन्ही नद्यांवर असलेल्या भुसावळ तालुक्यातील हातनूर धरणाचे संपूर्ण ४१ दरवाजे उघडण्यात आले. हतनूर धरणात ४५.७० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हतनूर परिसरात गेल्या पाच तासांमध्ये ३.३ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
चाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान सुरू असून तालुक्यातील मन्याड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली.
रात्री २ वाजेपासून धरणातून अंदाजे ६० ते ७० हजार क्युसेक विसर्ग चालू आहे. मन्याड व गिरणा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे.
नदीमधील काही भराव वाहून गेला असून त्यामुळे धरणाला कोणताही धोका नाही धरण सुरक्षित आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन चाळीसगाव पाटबंधारे उपविभागाचे उप विभागीय अभियंता हेमंत व्ही. पाटील यांनी केले आहे.