बारडच्या 'पोचम्मा देवी' चा जागर; तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्रारातून भाविकांची गर्दी | पुढारी

बारडच्या 'पोचम्मा देवी' चा जागर; तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्रारातून भाविकांची गर्दी

बारड,पुढारी वृत्तसेवा: बारड (ता. मुदखेड) येथील अलीकडच्या काळात ‘शीतलादेवी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि नवसाला पावणारी आख्यायिका असलेल्या देवीचे पुरातन नाव ‘पोचम्मा देवी’ असे आहे. चंद्रपूर येथील ‘धुर्पत’ माय देवीची बहीण म्हणून बारडची पोचम्मा देवी ओळखली जाते. नवरात्रीत पोचम्मा देवीच्या दर्शनासाठी तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून भाविक येत असतात. देवीला पुरणपोळीचा नैवद्य आणि खना नारळाची ओटी भरून भाविक भक्त आराधना करतात. भक्तांच्या नवसाला पावणारी देवी अशी आख्यायिका असल्यामुळे सतत भक्तांची अलोट गर्दी येथे पाहायला मिळते.

माजी आमदार तथा स्वातंत्र्य सेनानी साहेबराव सखोजीराव देशमुख यांच्या पूर्वजांच्या शिवारातील विहिरीत देवीचे वास्तव्य होते. तिचा प्रगट कालखंड ३५० वर्षांपूर्वीचा असावा, अशी धारणा आहे. ताम्रपटावरील उल्लेखानुसार, १४ गुंठे जागेवर देवीचा परिसर आहे. विश्वस्त म्हणून  प्रतापराव कुलकर्णी, जयवंतराव कुलकर्णी, स्वप्नील विजय कुलकर्णी काम पाहतात तर पुजारी म्हणून दत्तात्रय मोतोळे शेम्बोलीकर, देवबा पवार अखंड सेवेत असतात. रोज पहाटे देवीची नगाऱ्यासोबत गजर आरती, दुपारी मध्यान आरती तर सायंकाळी शेजारती होत असते. यावेळी देवीला हळदी कुंकवाच्या मळवटाचा साज, सोन्याचे दागिने, शालू चढविला जातो.

नवरात्रीत देवीच्या मंदिरात घटस्थापना करून नऊ दिवस देवीचा जागर मांडला जातो. अष्टमीला खीर आणि देवीला आवडणारा ‘तांबोळ’ महाप्रसादाचे वाटप होते. परिसरातील भक्तगणांकडून नवरात्रीत महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

पायाभूत सुविधांचा अभाव

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पोचम्मा देवी मंदिरास ‘क’ दर्जाचे तीर्थक्षेत्र घोषित केले हाेते. यामुळे एक किमी सिमेंट रस्ता आणि रोषणाईसाठी हायमास्क उभारण्यात आला आहे. या व्यतिरिक्त मंदिर परिसरात स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, स्नान गृह, राहण्यासाठी भक्तनिवास याची मोठी वाणवा असल्याने भक्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

आराध्यदैवत असलेल्या पोचम्मा देवीच्या दर्शनासाठी विविध राज्यातून भाविक येत असतात. भक्तांचा ओढा पाहता अनेक मूलभूत गरजांची पुर्तता होणे महत्त्‍वाचे आहे. विश्वस्थांना सोबत घेऊन परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू, असे स्वा. से. माजी आ. साहेबराव बापूंचे नातू सुनील देशमुख यांनी ‘दैनिक पुढारी’शी बोलताना सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button