संजय राऊत यांचा दसरा तुरुंगातच, जामीन अर्जावरील पुढील सुनावणी १० ऑक्टोबरला | पुढारी

संजय राऊत यांचा दसरा तुरुंगातच, जामीन अर्जावरील पुढील सुनावणी १० ऑक्टोबरला

मुंबई; पुढारी ऑनलाईन : पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना अद्यापही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. संजय राऊत यांच्या ईडी कोठडीतील मुक्काम आणखी १४ दिवसांनी वाढला आहे. त्यांच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी १० ऑक्टोबरला होणार आहे. संजय राऊत यांच्या वकिलांनी त्यांच्या जामिनावर युक्तिवाद केला आहे. आता ईडी पुढील सुनावणीवेळी युक्तिवाद करणार आहे. विशेष पीएमएलए न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी १० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.

संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला ED ने विरोध केला आहे. राऊत यांच्या जामीन अर्जावर EDने न्यायालयात याआधी प्रत्युत्तर दिले होते. “कारवाई टाकळण्यासाठी संजय राऊत या प्रकरणात प्रशांत राऊत यांच्या माध्यमातून काम करत होते. संजय राऊत प्रभावी नेते आहेत, त्यांना जामीन मिळाला तर ते पुरावे नष्ट करतील,” असे ED ने म्हटले आहे.

या प्रकरणात सरकारी मालमत्तेच्या मोबदल्यात संजय राऊत यांना वैयक्तिक लाभ झाला आहे. अशा प्रकारच्या भ्रष्टाचारांचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतो, त्यामुळे राऊत यांनी जो दिलासा मागितला आहे, तो अयोग्य आहे. या प्रकरणात प्रशांत राऊत यांच्या माध्यमातून राऊत यांनी मोठी भूमिका बजावली आहे. पैशाचा माग राहू नये, यासाठी ते पडद्यामागून काम करत होते. त्यामुळे या प्रकरणात आपल्याला कोणताही लाभ झालेला नाही, हे त्यांचे म्हणणे ग्राह्य मानता येणार नाही, असे EDने म्हटले होते.

सध्या हा खटला महत्त्वाच्या पातळीवर आहे. दररोज नवे पुरावे समोर येत आहेत. या पुराव्यातून या प्रकरणात राऊत यांनी कशी भूमिका निभावली हे पुढे येत आहे. त्यामुळे या स्थितीत त्यांना जामीन देणे योग्य होणार नाही, असे मत EDने नोंदवले आहे. राऊत सध्या पत्राचाळ पुर्नविकास प्रकरणात अटकेत आहेत. ED ने ज्या एक कोटी साठ हजार रुपयांची विचारणा केली होती, त्याचा खुलास करण्यात आला आहे, असा दावा त्यांनी केला होता.

हे ही वाचा :

Back to top button