जनावरांचे व्यवहार केल्यास कारवाई, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले; लम्पी हॉटस्पॉट राशीनमध्ये घेतली आढावा बैठक | पुढारी

जनावरांचे व्यवहार केल्यास कारवाई, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले; लम्पी हॉटस्पॉट राशीनमध्ये घेतली आढावा बैठक

राशीन, पुढारी वृत्तसेवा: लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी पातळीवर सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. आठवडे बाजार बंद असताना जनावराची खरेदी-विक्री करणार्‍या शेतकरी व व्यापार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला. राशीन हा लम्पीचा हॉटस्पॉट असल्यामुळे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी लंम्पी प्रादुर्भाव रोखण्यासाठी राशीन ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये काल आढावा बैठक घेतली.

या बैठकीमध्ये जनावरांवर वेळीच औषधोपचार होण्यासाठी राशीन व परिसरातील प्रत्येक गावामध्ये एक सरकारी व एक खासगी पशुधन विकास अधिकारी, तसेच लम्पीची गंभीर परिस्थिती असलेल्या गावात विद्यापीठाच्या तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली. जनावरांना ताबडतोब उपचार मिळावेत, यासाठी सहा चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. पशुधन विभागाचे कर्मचारी प्रत्येक गावामध्ये राहणार असून, त्यांची राहण्याची व जेवणाची सोय महसूल विभागामार्फत करण्यात येईल, असे यावेळी जिल्हाधिकारी भोसले सांगितले. तसेच जनावरांचे आठवडे बाजार बंद असताना जे शेतकरी, व्यापारी जनावरांचा व्यवहार करतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पुणे , सोलापूर, बीड जिल्ह्यातील जनावरांना घेऊन येणार्‍या वाहनांची तपासणी करण्यासाठी तालुक्यातील खेड, सिद्धटेक, खडकत, चिलवडी येथे चेक पोस्ट स्थापन करण्यात येणार आहेत.

तसेच प्रशासनाच्या वतीने धुरळणी फवारणी करण्यात येत आहे. प्रशासनाच्या वतीने विविध उपयोजना केल्या जात आहेत, असे ते म्हणाले. यावेळी तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ . अनभुले यांनी सांगितले की, कर्जत तालुक्यात सध्या 1152 जनावरे लम्पी बाधित आहेत. त्यामध्ये राशीनमधील 641 लम्पी बाधित जनावरांचा समावेश आहे. यामधील तालुक्यातील 573 जनावरे बरी झाली आहेत.
बैठकीस प्रांताधिकारी अजित थोरबोले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर , जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ. तुंबारे, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव. तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. अनभुले, राशीनच्या सरपंच नीलम साळवे, भांबोरेच्या सरपंच माधुरी लोंढे, चिलवडीचे सरपंच राजू हिरभगत, अतुल साळवे, राशीनच्या पशुधन विकास अधिकारी डॉ प्रेरणा सावळे, ग्रामविकास अधिकारी विजयकुमार बनाते यांच्यासह राशीन परिसरातील बारा गावांचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, सरकारी व खासगी पशुधन अधिकारी, जनावरांचे व्यापारी श्रीकांत सायकर यांच्यासह शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .

..तर जनावरांच्या मालकांवर कारवाई

लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली आहे . तसेच रस्त्यावर फिरणार्‍या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने जनावरांच्या मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला.

लम्पी आजाराने शेतकरी धास्तावल

लम्पीच्या आजाराने राशीन परिसरात थैमान घातले असून, जनावरांना मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. लाखो रुपये किमतीची जनावरे यात दगावत असल्याचे भीषण चित्र निर्माण झाले आहे. या आजारामुळे बळीराजा धास्तावला आहे .

Back to top button