नागपूर : एलसीबीने पकडला ३० टन तांदूळ, काळाबाजार विक्रीस जात असल्याचा संशय | पुढारी

नागपूर : एलसीबीने पकडला ३० टन तांदूळ, काळाबाजार विक्रीस जात असल्याचा संशय

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथील एका धान्य व्यापाऱ्याच्या गोडाऊनवर नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून एका ट्रकमधून काळ्याबाजारात विक्रीला जाणारा जवळपास ३० टन तांदूळ ताब्यात घेतला. मात्र, हा तांदूळ रेशनचा आहे की नाही? हे स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी आतापर्यत गुन्हा दाखल झालेला नाही.

याबबातची माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेला कोंढाळीपासून पाच किमी अंतरावरील मासोद येथून रेशनचा तांदूळ काळ्याबाजारात विक्रीला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलीस अधीक्षक विजकुमार मगर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांचे एक पथक तयार केले. या पथकाने रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मासोद येथील रमेश गांधी व सुरेश गांधी यांच्या घरातील गोडाऊनसमोर उभ्या असलेल्या ट्रक (क्रमांक सीजी ०८/एके ८०३२) तपासणी केली. यावेळी या ट्रकमध्ये जवळपास ३० टन पोत्यात भरलेला तांदूळ आढळला.

धान्य व्यापारी रमेश गांधी व सुरेश गांधी यांना विचारपूस केली असता त्यांनी हा रेशनचा तांदूळ नसून खुल्या बाजारातील तांदूळ असल्याचे सांगितले. परंतु, पोलिसांना रेशनचा तांदूळ असल्याचा संशय आल्याने या ट्रकला ताब्यात घेऊन कोंढाळी पोलीस ठाण्याच्या आवारात लावला आहे. या प्रकरणाची माहिती काटोलचे अन्न पुरवठा अधिकारी यांना रात्री उशीराने देण्यात आली. परंतु, अद्यापपर्यंत अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मालाची तपासणी व चौकशी केली नाही. त्यामुळे कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे.

शहरात पकडला दहा टन तांदूळ

पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी रविवारी रात्री उशिरा कारवाई करीत दहा टन तांदूळ पकडला. गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत जयश्री टॉकीजच्या मागे सुंदरलाल प्यारेलाल यांच्या किराना दुकानाचा बाजूला शासकीय स्वस्त धान्याचे दुकान आहे. या दुकानात काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाल्याने धाड टाकली. यात सुंदरलाल प्यारेलाल अरोरा (वय ६०) व त्यांचा मुलगा कुलदीप सुंदरलाल अरोरा (वय ३० वर्ष) यांची या प्रकरणी चौकशी करण्यात आली. ट्रकसह तांदूळ जप्त करण्यात आला.

हेही वाचलंत का? 

Back to top button