नागपूर : २० बाधितांमध्ये आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट; प्रशासनाची चिंता वाढली | पुढारी

नागपूर : २० बाधितांमध्ये आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट; प्रशासनाची चिंता वाढली

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या रुग्णांमध्ये चढउतार दिसत असतानाच, नागपुरात चिंता वाढविणारी माहिती पुढे आली आहे. राज्यात कोरोनाच्या बीए २.७५ या नवीन व्हेरिएंटच्या ३० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील तब्बल २० रूग्ण हे नागपूर विभागातील असून १७ नागपूर जिल्ह्यातील आहेत. नीरीच्या प्रयोगशाळेत या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट रुग्णांचे नमुने आढळून आले आहेत. २५ जुन २०२२ ते ५ जुलै २०२२ दरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांचा अहवालातून ही माहीती मिळाली आहे.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात कोरोनाच्या ओमायक्रॉन संवर्गाच्या नवीन रूपातील (बीए २.७५ ) विषाणूचा धोका वाढला आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे नागपूर जिल्ह्यात १७ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यामुळे प्रशासनासह आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील (नीरी) जनुकीय चाचणी प्रयोगशाळेत हे नमुने तपासण्यात आले आहेत.

नागपुरातील नीरीच्या प्रयोगशाळेत या व्हेरिएंटच्या रुग्णांचे नमुने १५ जून ते ५ जुलै या कालावधीत आढळून आले आहेत. एकूण रुग्णांमध्ये ११ पुरुष आणि ९ महिलांचा समावेश आहे. या रुग्णांपैकी १७ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. यामुळे रुग्णांना सौम्य लक्षणे दिसून आली आहे. काही रुग्णांमध्ये लक्षणे नसल्याची माहिती पुढे आली आहे.

मागील काही दिवसात नागपूर शहरात आणि जिल्ह्यात दररोज शंभरावर रुग्ण आढळून येत आहेत. गुरूवारी (दि.०७) दिवसभरात शहरात १ हजार ५२४ आणि ग्रामीणमध्ये ४४८ अशा जिल्ह्यात १ हजार ९७२ चाचण्या झाल्या. त्यापैकी ५.९९ टक्के म्हणजेच ११८ जण कोरोनाबाधित आढळून आले. यात शहरातील ८४ आणि ग्रामीणमधील ३४ जणांचा समावेश आहे. तर ९० जणांनी कोरोनावर मात केली. सध्या शहरात ४४३ आणि ग्रामीणमध्ये २०० असे जिल्ह्यात ६४३ सक्रिय कोरोनाबाधित आहेत. १८ जणांना लक्षणे असल्याने ते मेयो, मेडिकलसह इतर शासकीय व खासगी रुग्णालामध्ये उपचार घेत आहेत. लक्षणे नसलेले ६२५ रूग्ण हे गृह विलगीकरणात आहेत.

हेही वाचा:

Back to top button