पाऊस नसल्याने मेंढपाळ, पशुपालक चिंताग्रस्त | पुढारी

पाऊस नसल्याने मेंढपाळ, पशुपालक चिंताग्रस्त

लोणी भापकर : बारामतीतील चार्‍याच्या शोधात विविध जिल्ह्यांत गेलेले मेंढपाळाचे कळप पावसाळा सुरू झाल्याने परतीच्या प्रवासाला लागले आहेत. परंतु, दमदार पाऊस नसल्याने मेंढपाळ, पशुपालक चिंताग्रस्त झाले आहेत. पळशी, मासाळवाडी, कानाडवाडी, मोराळवाडी, मुढाळे इत्यादी गावांतील बाहेरगावी गेलेले मेंढ्यांचे कळप आता गावाकडे परतू लागले आहेत. मात्र जुलै महिन्याचा एक आठवडा संपला तरी अजून दमदार पाऊस नाही. भागात मार्चपासूनच दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने चारा व पाणीटंचाई जाणवत आहे. दरवर्षी दसर्‍यानंतर मेंढपाळांचे कळप चार्‍याच्या शोधात मावळ, नाशिक, कोकण आदी भागांत जात असतात.

मात्र, यंदा तालुक्याच्या पश्चिम जिरायती पट्ट्यात अजूनही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे बहुतेक कळप सुमारे पंधरा, वीस दिवस उशिरा परतले आहेत. ऊन, वारा, पाऊस अशा सगळ्याच परिस्थितीत कळपांना चरण्यासाठी घेऊन मेंढपाळांना विविध ठिकाणी फिरावे लागते. पावसाळा जवळ आला की जून-जुलैमध्ये घाट चढून कळप गावाकडे निघतात. ज्यांच्या शेतात कळप वस्तीला थांबतात त्या जमीन मालकाकडून चारा किंवा किरकोळ मोबदला मिळत असतो, असे संजय कोळेकर यांनी सांगितले.

Back to top button