पावसाळी आजारांसाठी आरोग्य पथक ‘ऑन फिल्ड’ | पुढारी

पावसाळी आजारांसाठी आरोग्य पथक ‘ऑन फिल्ड’

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सध्या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीने काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा काळात नागरिकांचे आरोग्य सुस्थितीमध्ये राहण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच उपकेंद्रांना भेटी देऊन विविध बाबींचा तसेच पावसाळी आजारांसाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध असल्याबाबतचा आढावा जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग घेणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विविध पंधरा अधिकार्‍यांची तीन पथके तयार केली आहेत.

ही पथके शुक्रवार (दि.8) आणि शनिवार (दि.9) या दोन दिवसांमधील जास्त पाऊस होणार्‍या तालुक्यांमधील आरोग्य संस्थांना भेटी देणार आहेत. अतिवृष्टी असणार्‍या तालुक्यांतील आरोग्य संस्थांना भेटी देऊन पूर्वनियोजन पाहणी करण्यात येणार आहे. वैद्यकीय सुविधा, औषध साठ्याची पाहणी केली जाणार आहे. औषधसाठा तपासणी करताना ई-औषधे आणि प्रत्यक्षात उपलब्ध असलेला साठा किती आहे हे पाहिले जाणार आहे. आरोग्य संस्थांमधील कमतरता अहवाल तयार करण्यात आला होता. त्यानुसार त्या संस्थांमध्ये सीएसआरअंतर्गत, तसेच जिल्हा परिषदेकडून साहित्य आणि साधनसामग्रीचे वाटप करण्यात आले होते. ही साधनसामग्री सुस्थितीत कार्यान्वित करण्यात आली आहे का, त्याची नोंद ठेवण्यात आली आहे का याची माहिती घेतली जाणार आहे.

आपत्ती व्यवस्थापनासाठी करण्यात आलेली तयारी म्हणजेच पूर्वनियोजन आणि इतर आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रमांचा या तीन पथकांकडून आढावा घेतला जाणार आहे. तीन पथकांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. अभय तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हा, मुळशी, मावळ या तालुक्यांमधील आरोग्य संस्थांना भेटी देणार ओहत. त्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आदेश दिले आहेत.

Back to top button