Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या घरावर सीबीआयची छापेमारी | पुढारी

Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या घरावर सीबीआयची छापेमारी

 मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या घरावर सीबीआयकडून छापे टाकण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाने सीबीआयने ही कारवाई केली आहे. सीबीआयने पांडे यांच्या मुंबई, चंदीगड, चेन्नई येथील घरावर आणि कार्यालयावरही छापे टाकले आहेत. फोन टॅप करण्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) अधिकार्‍यांचे फोन टॅपिंग आणि अनियमितता प्रकरणात सीबीआयने एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण, रवी नारायण आणि मुंबईचे माजी आयुक्त संजय पांडे यांच्याशी संबंधित देशभरात छापेमारी सुरु केली आहे. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण आणि माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यन यांच्यासह अन्य आरोपींशी संगनमत करून शेअर बाजाराच्या यादीत असलेल्या काही कंपन्यांना फायदा करुन देऊन आर्थिक गैरव्यवहार केला. एनएसई सर्व्हरच्या माध्यमातून करण्यात आलेल्या को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने 2018 मध्ये गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. सीबीआयने गेल्या चार वर्षांत केलेल्या तपासाच्या आधारे चित्रा रामकृष्ण, आनंद सुब्रमण्यन यांना अटक केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे 30 जूनला सेवा निवृत्ती झाले. त्यांच्याजागी विवेक फणसाळकर यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. सेवानिवृत्ती होऊन चार दिवस उलटत नाहीत तोवर त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने समन्स बजावले. यानंतर सीबीआयने एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण, रवी नारायण आणि मुंबईचे माजी आयुक्त संजय पांडे यांच्याविरुद्ध एनएसई अधिकाऱ्यांचे फोन टॅप करणे आणि इतर अनियमितता केल्याप्रकरणी नवीन गुन्हा दाखल केला आहे.

संजय पांडे शिवसेनेचे निकटवर्तीय

गेली चार महिन्यांपासून मुंबईचे माजी आयुक्त संजय पांडेची कारकिर्द बरीचशी वादग्रस्त ठरली आहे. संजय पांडे हे शिवसेनेचे निकटवर्तीय मानले जातात. ते पोलिस आयुक्तपदी असताना शिवसेनेविरोधात आवाज उठवल्याबद्दल भाजप नेते किरीट सोमय्या, मोहित कंबोज, नारायण राणे आणि अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तर संजय पांडे यांच्यावर ते महाविकास आघाडी सरकारचे एजंट असल्याची टीकाही केली होती.

हेही वाचा:

 

 

Back to top button