उमेश कोल्हे यांच्या हत्येचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन?; NIA चा ‘एफआयआर’मध्ये उल्लेख | पुढारी

उमेश कोल्हे यांच्या हत्येचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन?; NIA चा 'एफआयआर'मध्ये उल्लेख

अमरावती; पुढारी ऑनलाईन : अमरावतीतील उमेश कोल्हे (Umesh Kolhe’s murder) यांची हत्या ही एका गटाने रचलेल्या मोठ्या कटाचा भाग होता. ज्यांचा देशात काही लोकांमध्ये दहशत माजवण्याचा उद्देश आहे, असे कोल्हे हत्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) नोंद केलेल्या एफआयआरमध्ये नमूद केले आहे. कोल्हे यांची हत्या भारतातील काही लोकांच्यात दहशत माजविण्याच्या कटाचा एक भाग म्हणून करण्यात आली होती आणि या प्रकरणाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध असू शकतो, असाही पुढे उल्लेख NIA ने एफआयआरमध्ये केला आहे.

भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल काढलेल्या आक्षेपार्ह उद‍्गाराचे समर्थन केल्यामुळे उदयपूरपाठोपाठ महाराष्ट्राच्या अमरावती शहरातही एकाचा बळी घेण्यात आला होता. उदयपूर येथे मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दलच्या वक्‍तव्यावरून नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने कन्हैयालाल यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद उमटत असतानाच अमरावतीतील औषध विक्रेते उमेश कोल्हे (५४) यांची गेल्या २१ जून रोजी अमरावतीत भररस्त्यात अडवून गळा चिरून झालेली हत्याही याच प्रकरणातून झाल्याचे समोर आले. उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर अमरावतीमधील १० जणांना धमक्या देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे.

नुपूर शर्माच्या समर्थनार्थ लिहिलेला मजकूर उमेश कोल्हे व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवत होते म्हणून ही हत्या करण्यात आली. अमरावतीच्या कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी जनावरांचा डॉक्टर युसूफ खान बहादुर खान याला अटक केली आणि त्याच्या कबुलीतून नुपूर शर्मा प्रकरणाचा या हत्येशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले. नुपूर शर्माला पाठिंबा देणारी पोस्ट लिहिल्यामुळेच कोल्हेंची हत्या झाल्याचे अमरावतीचे पोलीस उपायुक्‍त विक्रम साळी यांनी याआधी सांगितले आहे.

कोल्हे हे नुपूर शर्माला पाठिंबा देत असून तसा मजकूर व्हॉट्सअ‍ॅपवर पसरवत आहेत असा मेसेज या डॉक्टर खान यानेच व्हॉट्सअ‍ॅपवर टाकला. त्यातून कोल्हेंच्या हत्येसाठी चिथावणीच दिली गेली होती.

उमेश कोल्हे हत्याकांडातील सातही आरोपींना घेऊन एनआयएचे पथक गेल्या बुधवारी मुंबईकडे गेले होते. २१ जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात सात आरोपींना अटक केली होती. या हत्येमागे नुपूर शर्मा यांच्या समर्थनाची पार्श्वभूमी पाहता सदर प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला. त्यानंतर सातही आरोपींना एनआयएने ताब्यात घेतले. नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या काही नागरिकांना धमक्या मिळाल्या होत्या. धमकी देणाऱ्या व्यक्तींना पोलिस ठाण्यात बोलावून, पोलिसांनी त्याचीही चौकशी केली. त्यांच्याही घराची झडती घेण्यात आल्याची माहिती आहे.

उमेश कोल्हे हत्याकांडात आणखी एका सीसीटिव्ही कॅमेऱ्याचा व्हिडीओ पुढे आला आहे. ५४ सेकंदाच्या या व्हिडिओत ३ आरोपी उमेश कोल्हे यांना थांबवित त्यांना टोंगळ्यावर बसवून हल्ला करीत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओच्या आधारे पोलिस तपास करीत आहे. एनआयएचे डीआयजी विक्रम खलारे, एएसपी प्रवीण हिंगवटे, अधिकारी बनसोड यांचा समावेश असलेले एनआयएचे पथक या प्रक्रियेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Back to top button