अमरावती : मेळघाटात साथीच्या रोगाचा संसर्ग; दोघांचा मृत्यू, ५० रुग्णांवर उपचार सुरू | पुढारी

अमरावती : मेळघाटात साथीच्या रोगाचा संसर्ग; दोघांचा मृत्यू, ५० रुग्णांवर उपचार सुरू

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : मेळघाटातील पाचडोंगरी (ता.चिखलदरा) या गावात अशुद्ध पाण्यामुळे संपूर्ण गावात डायरियाची लागण झाली आहे. अशुद्ध पाण्यामुळे हा आजार फैलावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संडास, उलटी या साथीच्या रोगाचा संसर्गाने पाचडोंगरी हे गाव संपूर्ण कवेत घेतले आहे. येथील घराघरात रुग्ण सापडत असून, या आजाराने दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर ५० रुग्णांवर उपचार सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तर ग्रामीण रुग्णालय चुरणी व प्राथमिक आरोग्य केंद्र काटकुंभ या ठिकाणी ३५ ते ४० रूग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित लोकांसाठी गावातच आरोग्य विभागामार्फत शिबिर भरविण्यात आले आहे. सविता अखंडे व गंगाराम धिकार या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्णांना गावातच उपचार देणे सुरू आहे, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

आदिवासी बांधवांना शुद्ध पाणी मिळत नसल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात अनेक साथीच्या आजारांना बळी पडावे लागते. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या गावात साथीचा आजार बळावतो आणि साथीच्या आजाराबरोबरच कुपोषण डोके वर काढते. त्यामुळे मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो. बुधवारी सायंकाळपासून आरोग्य विभागाचे सर्वच कर्मचारी आणि अधिकारी गावात पोहोचले आहेत. गावातील शाळेमध्येच उपचारासाठी कॅम्प लावण्यात आले आहेत. पाण्याचे नमुने तपासणी, गावात प्रत्येक घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून करण्यात येत आहे. या आजारात संडास उलटी ही महत्त्वाची लक्षणे असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश प्रधान यांनी दिली.

गुरुवारी (दि.७) ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे पाचडोंगरी व कोयलारी गावांमध्ये उल्टी व संडासची साथ सुरु झाल्यामुळे अनेक रुग्ण अस्वस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे उपचार  सुरु आहेत.
-रामदेव वर्मा, वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालयल चुरणी 

हेही वाचा:

Back to top button