

नगर : दहा तारखेपूर्वी महापालिका कर्मचार्यांचे पगार करते, मात्र नेतागिरी करणार्या कर्मचार्यांमुळे प्रामाणिक कर्मचार्यांच्या जून महिन्याच्या पगाराला विलंब होत आहे. नेतागिरी करणार्यांच्या मस्टरवर सह्या नसल्याने आस्थापना विभागानेही त्यांच्यापुढे टेकले आहे. आता ज्याचे हजेरी पत्रक येईल, त्यांचेच पगार होणार तर दांडीबहाद्दर नेतागिरी कर्मचार्यांची कायमची बिनपगारी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. नेतागिरीवाल्यांशिवाय प्रशासनाने इतरांचे पगार बँकेत सोडण्याची तयारी सुरू केल्याची माहिती हाती आली आहे.
महापालिकेत सध्या एक हजार 653 कर्मचारी कार्यरत आहेत. महापालिकेच्या कर्मचार्यांचा मंजूर आकृतिबंद 2 हजार 871 कर्मचार्यांचा आहे. कर्मचारी भरती प्रक्रियेला मान्यता नसल्याने विविध विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. महिन्यांची पाच तारीख आल्यानंतर कर्मचार्यांना पगारचे वेध लागतात. एक तारखेपासून प्रत्येक विभागातून कर्मचार्याचे हजेरी पत्रक दिले जाते.
नेतागिरी करणार्या सुमारे शंभर कर्मचार्यांच्या सह्या नसल्याने त्यांचे हजेरी पत्रक अस्थापना विभागाकडे आलेले नाही. आस्थापना विभागाकडून हजेरीपत्रक सामान्य प्रशासन विभागाकडे जाते. त्यानंतर पगार बिले बँकेत जातात. जून महिन्याची पगार बिले अद्यापपर्यंत बँकेत गेलेले नाहीत. त्यामुळे जूनचा पगार दहा तारखेच्या पुढे होण्याची शक्यता आहे.
सध्या सर्व कर्मचारी पगाराची वाट पाहत आहेत. मात्र, अनेक विभागाकडून आस्थापना विभागाकडे हजेरी पत्रकच आलेले नाहीत. आस्थापना विभागाकडून सर्वच विभागाच्या हजेरी पत्रकाचा अहवाल मागविला आहे. ज्या विभागाचा हजेरीचा अहवाल आला. त्याच विभागाचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडे जाणार आहेत आणि त्यांचे पगार होण्याची शक्यता आहे.
'त्या' कर्मचार्यांना चाप बसणार
राजकीय नेत्यांप्रमाणे अंगात सफेद कपडे घालणारे अनेक कर्मचारी अस्थापनेवर आहेत. आयुक्तांना ते कर्मचारी की नगरसेवक हेही कळून येत नाही. कामावर न येताच ते पगार घेत असल्याची ओरड नेहमीची झाली आहे. नेतागिरीवाल्यांच्या मस्टरवर सह्या नसल्याने इतरांचे पगार अडकून पडले आहेत. पण आता त्या कर्मचार्यांची गैरहजेरी लावली जाणार असून त्यांना पगाराला कायमचे मुकावे लागणार आहे.
काम करूनही मिळेना दाम..
आम्ही वर्षांनुवर्षे वेळेत येतो आणि काम करतो. पण, काही लोक नेहमी गैरहजर राहतात आणि पगार घेतात. आम्ही काम करूनही वेळेत पगार मिळत नाही. नेतागिरीवाल्यांना मात्र, काम न करता पगार मिळातो, अशी कुजबुज महापालिका कर्मचार्यांमध्ये नेहमी होते.
दहा तारखेपर्यंत कर्मचार्यांचे पगार होतील. मात्र, ज्या विभागाकडून कर्मचार्यांचे हजेरी पत्रक येणार नाही. त्यांचे पगार होणार नाहीत. गैरहजर कर्मचार्यांचा पगार होण्याचा प्रश्नच नाही.
श्रीनिवास कुर्हे,
उपायुक्त मनपा(सामान्य प्रशासन)