सांगली : संभाव्य महापुरात दिलासा देण्यासाठी ‘मदतकार्य समिती’

संग्रहित
संग्रहित
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगलीला यावर्षीही महापुराचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पूरग्रस्त नागरिकांना मदत, सुटका, निवारा, जेवणाची व्यवस्था तसेच जनावरांना चारा, पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन लोकनेते राजारामबापू पाटील विचारमंच संचलित सांगली आपत्ती मदतकार्य समितीने केले आहे, अशी माहिती समितीचे समन्वयक माजी नगरसेवक शेखर माने यांनी दिली. माने म्हणाले, महापुराचा तडाखाच एवढा मोठा असतो की प्रशासन यंत्रणा सर्व ठिकाणी सर्व काळ पोहोचू शकत नाही. त्यातूनच 'आपत्ती निवारण मदत कार्य समिती' स्थापन करण्याची गरज निर्माण झाली.

माजी मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाने समिती काम करणार आहे. पूरग्रस्तांसाठी तात्पुरती निवारा केंद्र, वैद्यकीय सेवा, जनावरांसाठी तात्पुरत्या चारा छावण्या, व्यापार्‍यांच्या मालाची वाहतूक व सुरक्षितता यामध्ये समन्वय व मदत पुरवली जाणार आहे. पूर ओसरल्यानंतर कचरा उठाव, औषध फवारणी आयोजित करून शहराचे जनजीवन तात्काळ पूर्वपदावर आणण्यासाठी समिती काम करणार आहे, असे माने यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक, संजय चव्हाण, रेडिमेड गारमेंट असोसिएशनचे अध्यक्ष शामसुंदर पारेख, पांडुरंग व्हनमाने, भास्कर विभुते, विकास हिप्परकर उपस्थित होते.

'सांगली महापूर अ‍ॅप'

व्यापारी, नागरिक, तरुण मंडळे व स्वयंसेवी सामाजिक संस्था, विविध संघटना एकत्र येऊन स्वेच्छेने या समितीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. समितीने पुढाकार घेऊन विविध समन्वय समित्या स्थापन केल्या आहेत. सांगली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हायटेक आपत्ती निवारण तसेच मध्यवर्ती मदत व माहिती केंद्र कार्यान्वित आहे. सांगली पाटबंधारे विभाग कोयना तसेच चांदोली धरण व्यवस्थापन, अलमट्टी धरण प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका प्रशासन, पोलिस प्रशासन आदि यंत्रणांशी समन्वय साधून नागरिकांना वेळोवेळी धरण पातळी, आयर्विन पूल पाणीपातळी तसेच पूरप्रवण नागरी क्षेत्रांमध्ये येणार्‍या पाण्याबद्दल योग्य माहिती दिली जाईल. त्याबाबतचे 'सांगली महापूर' हे अ‍ॅप दोन दिवसात नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर डाऊनलोड करून घेता येईल, असे माने यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news