जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर प्रचारसभेत हल्ला, छातीत गोळी लागली, हल्लेखोराला अटक | पुढारी

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर प्रचारसभेत हल्ला, छातीत गोळी लागली, हल्लेखोराला अटक

टोकियो; पुढारी ऑनलाईन : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर नारा शहरात हल्ला करण्यात आला आहे. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे वृत्त जपानच्या NHK WORLD News ने दिले आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे हे पश्चिम जपानमधील नारा शहरातील एका प्रचारसभेत संबोधित करत होते. भाषण करत असताना ते अचानक खाली कोसळले. त्यांच्यावर गोळीबार झाला असून त्यांच्या छातीत गोळी लागली आहे. यामुळे ते गंभीर जखमी झाले असून बेशुद्ध अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. बंदुकीच्या गोळीसारखा आवाज ऐकू आला आणि आबे रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले, असे जपानच्या एनएचके वर्ल्ड न्यूजने म्हटले आहे. या हल्लाप्रकरणी पोलिसांनी नारा शहरातील ४१ वर्षीय यामागामी तेत्सुयाला याला हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्याच्याकडून बंदूक जप्त करण्यात आली आहे.

नारा शहरात लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराच्या निवडणूक प्रचारासाठी भाषण करत असताना शिंजो आबे हे अचानक खाली कोसळले. घटनास्थळी असलेल्या पत्रकारांनी त्यांना गोळी लागल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरुन एका संशयिताला अटक केली आहे.

एका वृत्तानुसार, आबे यांच्यावर पाठीमागून गोळीबार करण्यात आला. संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या रविवारच्या निवडणुकीपूर्वी आबे निवडणूक प्रचारसभेत भाषण करत होते. त्यावेळी ही घटना घडली आहे. आबे यांना उपचारासाठी नारा मेडिकल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.

Back to top button