नंदुरबार : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोघा तरूणांचा बुडून मृत्यू | पुढारी

नंदुरबार : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोघा तरूणांचा बुडून मृत्यू

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : मित्रांसोबत पोहोण्यासाठी गेलेल्या दोन तरूणांचा डॅमच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. नंदुरबार शहराजवळील झराळी डॅम येथे ही घटना घडली. दीपक वाकडे असे एका तरूणाचे नाव असुन तो पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक आणि त्याचा मृत मित्र अन्य मित्रांसह डॅमवर पोहण्यासाठी गेले होते. पोहून झाल्यानंतर ते दोघे बाहेर आले नसल्याने बाकीचे मित्र घाबरले. त्यांनी आरडाओरडा केला असता जवळचे लोकांनी धाव घेतली. येथील महाराज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका पोहणाऱ्याने शोध घेण्यास सुरूवात केली. तसेच याबाबतची माहीती पालकांना देण्यात आली. सुमारे दोन तासांच्या शोधानंतर दिपक आणि त्याच्या मित्राला शोधण्यात यश आले. त्यानंतर त्यांना नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दीपक हा शहर पोलीस ठाण्यातील चालक तथा पोलिस हवालदार सुनील वाकडे यांचा मुलगा आहे. ही घटना समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर अधीक्षक विजय पवार, उपाधीक्षक सचिन हिरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, शहर पोलीस निरीक्षक किरण खेडकर, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. गतवर्षी या डॅम मध्ये तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

हेही वाचलंत का ?

Back to top button