शेतक-यांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पाऊले उचलावीत : नितीन गडकरी

नितीन गडकरी
नितीन गडकरी
Published on
Updated on

अकोला: पुढारी वृत्तसेवा : कृषी विद्यापीठांनी सहावा, सातवा वेतन आयोगाचा विचार करण्यापूर्वी शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा होईल यासाठी पाऊले उचलावीत असे आवाहन केले. भविष्याचा वेध घेवून पारंपरिक पीक पद्धतीमुळे भविष्य बदलणार नाही ही खुणगाठ मनाशी बांधावी, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात येथे केले.

महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, माजी कुलगुरू पद्मश्री डॉ. मोतीलाल मदान, कुलसचिव डॉ. एस.आर. काळबांडे व्यासपीठावर होते. अन्नधान्य, इंधन आणि खते या भोवती जागतिक अर्थकारण फिरत असल्याचे सांगून नितीन गडकरी म्हणाले की, कृषी विद्यापीठांनी आपली उत्पादने निर्यात करण्यावर भर द्यावा.  संत्रा, डाळिंब यांना बाहेर मागणी आहे. त्यावर फोकस करावा लागेल. विकासात्मक दृष्टी ठेवल्याशिवाय शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत.

कृषी क्षेत्राकडे जोवर उद्योग म्हणून आम्ही पाहणार नाही तोवर विकासाचा मार्ग गवसणार नाही. कृषी पदवीधरांनी शेतक-यांना प्रशिक्षित करण्यास प्राधान्य द्या, असे आवाहनही गडकरी यांनी केले. ५ वर्षानंतर पेट्रोलला पर्याय द्यावाच लागेल. येत्या पाच वर्षानंतर पेट्रोलचे साठे संपल्यास आम्हाला हायड्रोजन, सीएनजी, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावाच लागेल, असे सांगून नितीन गडकरी म्हणाले. बायो तंत्रज्ञानाद्वारे बायो मास आणि त्यातून बायो इंधनाच्या निर्मितीवर भर द्यावा लागेल. इथेनॉल आणि तत्सम उत्पादनांना त्यामुळेच प्राधान्य देत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी माजी कुलगुरू डॉ. मोतिलाल मदान यांनी सुद्धा विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, कृषी क्षेत्रातील बदलत्या आव्हानांचा स्वीकार करावा लागेल. देशातील मुले, महिला यांना पोषक आहार मिळावा यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. नितीन गडकरी यांच्यामुळे जैव विविधता पार्क सारख्या अनेक गोष्टी मूर्त स्वरुपात आल्याचेही डॉ. मदान यांनी सांगितले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यार्थ्यांना पदव्यांचे वितरण करण्यात आले. आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार विप्लव बाजोरिया, जिल्हाधिकारी नीमा अरोरा, पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

राज्यपालांना शेतकरी आत्महत्येची चिंता

महाराष्ट्र सुंदर प्रदेश असला तरी या भागातील शेतकरी आत्महत्या करतात, हे पटत नाही. हे थांबायला हवे. याविरोधात लढावेच लागेल. नितीन गडकरी यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तिमत्वसोबत आहे. त्याचा राज्यातील जनेतेने लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. जलयुक्त शिवार योजनेला उत्तेजन मिळावे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात विदर्भात आम्ही क्रांती घडवू अशी इच्छाशक्ती जागवा, असे आवाहनही त्‍यांनी केले.

नितीन गडकरी 'डॉक्टर ऑफ सायन्स' ने सन्मानित

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने नितीन गडकरी यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. गडकरी यांनी समाजहिताला दिलेली जोड तसेच कृषी क्षेत्रातील त्यांचे योगदान दूरगामी असून याबाबी लक्षात घेऊन विद्यापीठ सन्मान देत आहे, असे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी पदवी प्रदान करण्यामागील भावना सांगितली.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news