पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या पतीस जन्मठेप; बारामती सत्र न्यायालयाचा निकाल | पुढारी

पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या पतीस जन्मठेप; बारामती सत्र न्यायालयाचा निकाल

बारामती : पत्नीचा गळा दाबून खून केल्याच्या खटल्यात जावेद बबलू पठाण (मूळ रा. माटकगाव, ता. खेर, जि. अलिगड, उत्तरप्रदेश, सध्या रा. रुई, बारामती) याला येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश जे. ए. शेख यांनी जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास पठाण याला दोन महिने कारावास सोसावा लागणार आहे.

शहरातील रुई भागात २३ जून २०१७ रोजी जावेद पठाण याने पत्नी मिनाचा घरातील खर्चावरून व पैशाच्या कारणावरून चिडून जात रागाच्या भरात गळा दाबून खून केला होता. याबाबत बारामती तालुका पोलिस ठाण्यात सरकार पक्षातर्फे हवालदार बाळासाहेब सोनवलकर यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार जावेद याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक पी. व्ही. काळे यांनी करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲड. सुनील वसेकर यांनी काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासले. या खटल्यात साक्षीदार व तपास अधिकारी यांची साक्ष नोंदविण्यात आली. फिर्यादी व इतर साक्षीदार यांचे जबाब व ॲड. वसेकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने जावेद पठाण याला जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक निरीक्षक अशिविनी शेंडगे यांनी खटल्याचे अधिकारी म्हणून काम पाहिले. हवालदार अभिमन्यू कवडे, एन. ए. नलवडे यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.

Back to top button