पुणे: तीन अपत्ये असल्याने तीन संचालक घरी; दावडी सोसायटीतील खळबळजनक निकाल | पुढारी

पुणे: तीन अपत्ये असल्याने तीन संचालक घरी; दावडी सोसायटीतील खळबळजनक निकाल

राजगुरुनगर, पुढारी वृत्तसेवा: तीन अपत्ये असल्यावरून दावडी (ता. खेड) विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या तीन संचालकांना अपात्र ठरविण्यात आले आहे. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत निवडून आल्यावर अवघ्या काही महिन्यांत या संचालकांना अशा कारवाईला सामोरे जावे लागण्याच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. साहेबराव कोंडिबा दुंडे, प्रकाश खंडू शिंदे आणि रामदास अनंता बोत्रे अशी अपात्र ठरविलेल्या संचालकांची नावे असल्याची माहिती तालुका सहाय्यक निबधंक हरिशचंद्र कांबळे यांनी दिली.

दावडी विविध विकास सोसायटीची निवडणूक दोन महिन्यांपूर्वी पार पडली होती. पॅनेलद्वारे झालेल्या या निवडणुकीत अपात्र संचालकांसह १३ जण निवडून आले होते. तर विरोधातील एकही संचालक निवडून आला नव्हता. साहेबराव कोंडिबा दुंडे, प्रकाश खंडू शिंदे आणि रामदास अनंता बोत्रे हेही निवडून आले होते. या उमेदवारांना तीन अपत्ये असूनही शासकीय नियमांचे पालन न करता त्यांनी निवडणूक लढविली. या तीन जणांनी याबाबतची माहिती लपवून निवडणूक अधिकाऱ्याची फसवणूक केली. त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी मारुती बोत्रे व इतर ग्रामस्थांनी केली होती. खेडचे सहाय्यक निबंधक अधिकारी हरिशचंद्र कांबळे यांनी निवडून आलेल्या उमेदवारांना नोटिसा पाठवून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच सर्व पुरावे तपासून शासनाच्या नियमानुसार कारवाई करून त्यांना अपात्र ठरविले.

Back to top button