पुणे: मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ | पुढारी

पुणे: मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ

धनकवडी, पुढारी वृत्तसेवा: मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यापासून काहींच्या मतदार यादीतील नावासमोर अन्य व्यक्तींचे फोटो आले आहेत. धनकवडी, बालाजीनगर, भारती विद्यापीठ परिसर, आंबेगाव पठार या भागांतील प्रभागांमधील मतदार यादीत या चुका झाल्याचे दिसून आले. मागील अनेक निवडणुकांत मतदारांचे नाव ज्या प्रभागांत असते ते यंदा दुसर्‍या प्रभागांत गेल्याचे दिसून येत आहे. तसेच, राहत्या ठिकाणच्या पत्त्यावर व मतदान कार्डवर दुसर्‍याच मतदाराचा फोटो झळकत आहे. काही अशी उदाहरणे आहेत, की गेल्या तीस वर्षांपासून ज्या एका ठिकाणी मतदार यादीत नाव असूनही तेथेच मतदान करणार्‍याची नावे वगळण्यात आली आहेत. तर त्याच नावाच्या मूळ मतदारांची नावे व मतदार कार्ड नंबर हे दुसर्‍याच प्रभागात दुसर्‍याच फोटोसह लावलेले मतदार यादीत पाहायला मिळत आहे. याबाबत मतदारांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय भागातील प्रभाग क्रमांक 49, 55, 56 या प्रभागांतून सुमारे 11 हजारांहून अधिक मतदारांच्या पत्ता, नाव, फोटो, क्रमांक याबाबत चुकीच्या नोंदी झाल्या आहेत. त्याबाबत तपासणी सुरू असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.
प्रभाग क्र. 49 मध्ये दुसर्‍या प्रभागातील साधारण तीन हजार मतदारांची नोंद झाल्याचे दिसते. मूळ प्रभागातील सुमारे चार हजार मतदार दुसरीकडे गेल्याचे दिसते, असे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सांगितले. प्रभाग क्र. 55 मधील चार हजार मतदार प्रभाग क्र. 56 मधील यादीत दिसत आहे, असे माजी नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे यांनी सांगितले. प्रभाग 56 मधील प्रभागातून लगतच्या प्रभागमध्ये जवळपास 4000 मतदारांची नावे गेल्याची माहितीही त्यांनी दिली.

Back to top button