England Political Crisis : ऋषी सुनक बनले इंग्लंडचे ‘एकनाथ शिंदे’, पंतप्रधान पदाची माळ गळ्यात पडणार? | पुढारी

England Political Crisis : ऋषी सुनक बनले इंग्लंडचे ‘एकनाथ शिंदे’, पंतप्रधान पदाची माळ गळ्यात पडणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पक्षातील बंडखोरीनंतर गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या अनेक मंत्र्यांसह ५० हून अधिक जणांच्या दोन दिवसांच्या राजीनामा नाट्यानंतर जॉन्सन यांच्यावर दबाव निर्माण झाला. परिणामी त्यांनीही पंतप्रधान पदावरून पायउतार होत आपल्या पदाचा राजीनामाच दिला. जॉन्सन एकाकी पडले आहेत असून, सहकारी ख्रिस पिंचर (Chris Pincher) यांच्‍या ‘सेक्स स्कँडल’कडे कानाडोळा करणे जॉन्‍सन यांना भलतेच महागात पडले आहे. जॉन्सन यांच्यावरील दबावाची ही प्रक्रिया ५ जुलै रोजी सुरू झाली, जेव्हा यूके सरकारमधील अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी राजीनामा दिला. यानंतर आरोग्यमंत्री साजिद वाजिद यांच्या राजीनाम्याने त्यांची खुर्ची धोक्यात आली. (England Political Crisis)

सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या चार कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. यात सुनक आणि साजिद वाजिद यांच्याशिवाय सायमन हार्ट आणि ब्रँडन लुईस यांचाही यात समावेश आहे. दरम्यान, जॉन्सन सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे इंग्लंडचे पुढील पंतप्रधान होण्याची दाट शक्यता आहे. सुनक हे इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि ज्येष्ठ उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. (England Political Crisis)

सुनक (वय ४२) यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये इतिहास घडवला जेव्हा बोरिस जॉन्सन यांनी त्यांची देशाचे अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केली. या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला, एका आघाडीच्या ब्रिटीश बुकीने देखील भाकीत केले होते की बोरिस जॉन्सन लवकरच राजीनामा देऊ शकतात आणि ऋषी सुनक त्यांच्या जागी नवीन पंतप्रधान होऊ शकतात. पण सुनक यांच्या व्यतिरिक्त पेनी मॉर्डंट, बेन वॉलेस, साजिद वाजिद, लिझ ट्रस आणि डॉमिनिक राब यांचीही नावे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत.

ऋषी सुनक यांचे शिक्षण आणि कारकीर्द

भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचा जन्म यूकेमधील साउथॅम्प्टन येथे झाला. त्यांनी यूकेच्या विंचेस्टर कॉलेजमधून राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला, जिथे त्यांनी तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला. ते स्टॅनफोर्ड विद्यापीठात फुलब्राइट स्कॉलर होते, जिथून त्यांनी एमबीए केले. ऋषी सुनक यांनी ग्रॅज्युएशननंतर गोल्डमॅन सॅक्समध्ये काम केले आणि नंतर हेज फंड फर्ममध्ये भागीदार बनले.

राजकारणात येण्यापूर्वी ऋषी सुनक यांनी अब्जावधी पौंडांची जागतिक गुंतवणूक कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी ब्रिटनमधील छोट्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उपयुक्त ठरली. सुनक यांचा विवाह इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक आणि ज्येष्ठ उद्योगपती नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीशी झाला आहे. त्यांना कृष्णा आणि अनुष्का या दोन मुली आहेत.

राजकारणात प्रवेश…

यॉर्कशायरमधील रिचमंडचे खासदार ऋषी सुनक २०१५ मध्ये पहिल्यांदा संसदेत पोहोचले. त्यावेळी ब्रेक्झिटला पाठिंबा दिल्यामुळे पक्षात त्यांचे वजन वाढत गेले. त्यांच्या संसदीय मतदारसंघाती ५५ टक्के लोकांनी युरोपियन युनियन (EU) सोडण्याच्या बाजूने मतदान केले. त्यानंतर कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा उगवता तारा म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिले जात आहे. पक्षातील अनेक बडे नेते त्यांच्या कार्यपद्धतीचे वारंवार कौतुक करत आहेत.

ऋषी सुनक हे फिटनेसच्या बाबतीत खूप उत्साही आहेत. क्रिकेट, फुटबॉल व्यतिरिक्त त्यांना चित्रपट पाहण्याचीही आवड आहे. त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व पाहून त्यांना डिशी ऋषी या टोपण नावानेही संबोधले जाते. जॉन्सन सरकारच्या प्रेस ब्रीफिंगमध्ये ते सरकारचा चेहरा पुढे यायचे. यावरूनच त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो.

कोरोना संसर्गाच्या काळात त्यांनी ब्रिटनला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ऋषी सुनक यांनी अतोनात प्रयत्न केले. त्यांच्या कार्यपद्धतीने सर्व वर्गातील लोक त्यांच्या कामावर खूश होते. कोरोनाच्या काळात त्यांच्या धोरणांमुळे ब्रिटनमधील लोकांचे वेतन कमी होऊ दिले नाही, त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. तसेच कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्या पर्यटन उद्योगाला त्यांनी १० हजार कोटींचे पॅकेज दिले होते.

ऋषी सुनक वादातही राहिले

ब्रिटनमधील पार्टीगेट घोटाळा प्रकरणामुळे बोरिस जॉन्सन यांची खूप बदनामी झाली. त्याचा फटका सुनक यांनाही बसला. पार्टीगेट घोटाळ्याप्रकरणी सुनक यांना दंडही ठोठावण्यात आला होता. खरं तर, कोविड-१९ प्रोटोकॉल दरम्यान, मे २०२० मध्ये पंतप्रधानांच्या डाऊनिंग स्ट्रीट निवासस्थानी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीचे फोटो आणि काही ईमेल लीक झाल्यानंतर हे प्रकरण तापले. त्यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या प्रकरणाबद्दल जाहीर माफीही मागितली. या प्रकरणानंतर ऋषी सुनक यांच्या लोकप्रियतेत घट झाली. त्यांच्या पत्नी अक्षता यांच्यावर कर चुकवल्याचे आरोप झाले. या प्रकरणांमुळे सुनक दांपत्यावर जोरदार टीकेची झोड उठली होती. (England Political Crisis)

ऋषी सुनक यांना भारताबद्दल काय वाटते?

भारताची बाजू मांडताना ते म्हणाले की, ब्रिटनला भारताला कमी लेखणे टाळावे लागेल. भारतात अनेक संधी आहेत आणि भारत आशेने भविष्याकडे पाहत आहे. आम्हाला (इंग्लंड) भारताच्या दृष्टीने ते स्थान मिळवायचे आहे, ज्याने दोन्ही देशांचे संबंध पुन्हा आणखीन दृढ होतील. दोन्ही देशांमध्ये समान भागीदारी असली पाहिजे. ब्रिटनमध्ये येणार्‍या भारतीयांचे जीवन कसे सुसह्य करता येईल याकडे आमचे लक्ष असले पाहिजे, असे सांगितले. (England Political Crisis)

Back to top button