धुळे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांना वातावरणीय बदलांमुळे सतर्क राहण्याचे निर्देश | पुढारी

धुळे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांना वातावरणीय बदलांमुळे सतर्क राहण्याचे निर्देश

धुळे : पुढारी वृत्तसेवा

वातावरणीय बदलांमुळे नैसर्गिक आपत्त्तींच्या स्वरूपात बदल होत आहेत. अशा परिस्थितीत सर्व शासकीय यंत्रणांनी पूर्व तयारी करून सतर्क राहण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव तथा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पालक सचिव रस्तोगी यांनी घेतलेल्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे (शिरपूर) यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

वातावरणीय बदलांमुळे अनपेक्षित नैसर्गिक आपत्ती येवू शकतात. संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागाने पूर्व तयारी करणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक साधनसामग्रीची उपलब्धता करून ठेवावी. मनुष्यबळाच्या नियोजनासाठी स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक, औद्योगिक संस्थांची मदत घ्यावी. संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याविषयीची माहिती देण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन पालक सचिव रस्तोगी यांनी केले.

बैठकीत जिल्हा वार्षिक योजना, मानव विकास मिशन, पीक कर्ज योजना, पीक विमा योजना, नवसंजीवनी योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून जिल्ह्यात आतापर्यंत 80 टक्के क्षेत्रात विविध पिकांचा पेरा झाला आहे. खरीप हंगामासाठी ऑगस्टपर्यंत पीक कर्ज वितरणाच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. कोविड 19 प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्यात येत असून लसीकरणावर भर देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

हेही वाचा :

Back to top button