राज ठाकरेंच्या भोंग्याने मनसेत नाराजीची ‘चालीसा’ ! आणखी एका मुस्लीम पदाधिकाऱ्याचा राजीनामा | पुढारी

राज ठाकरेंच्या भोंग्याने मनसेत नाराजीची 'चालीसा' ! आणखी एका मुस्लीम पदाधिकाऱ्याचा राजीनामा

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : भोंगा प्रकरणी राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका मनसेसाठी महागात पडलीय. यामुळे मनसे नेत्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे. आता मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी राजीनामा दिला आहे. मशिदीवरील भोंग्यांना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विरोध केला आहे. भोंगे काढण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला डेडलाइन दिली आहे. पण राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे मनसेला धक्क्यामागून धक्के बसू लागले आहेत. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराजी दर्शवत मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मनसे पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.

गुढीपाडव्याला घेतलेल्या सभेत मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यावरून आक्षेप घेत हनुमान चालीसा वाजवू असे वक्तव्य केले होते. त्यानंतर देशातून विविध राजकीय व्यक्तींनी यावर प्रतिक्रिया दिल्या. या वक्तव्यानंतर आलेल्या प्रतिक्रियांना उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांनी ठाणे येथे उत्तर सभेचे आयोजन केले होते. या सभेत देखील त्यांनी भोंगे काढण्यासाठी ३ मे पर्यंत मुदत दिली.
यानंतर मनसे पक्षातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी एका धर्माला ‘ साहेब का टार्गेट करत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. अनेक गरजू विद्यार्थी मदरशांमध्ये शिक्षण घेतात. त्यामुळे आम्हाला विचारले असते तर मदरशांमध्ये नेमके काय चालते? ते सांगितले असते, असे म्हणत मुस्लिम पदाधिकार्‍यांनी राज ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली. इतकेच नव्हे तर त्यांनी आपले राजीनामे राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.

गुढीपाडव्याच्या सभेनंतर मनसेचे महाराष्ट्र राज्य सचिव पदावर कार्यरत असणाऱ्या इरफान शेख यांनी आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या, आज समाजाला कसे सामोरे जायचे, १६ वर्षाचा फ्लॅशबॅक आठवला आणि डोळ्यात पाणी आले, अशी भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. पक्षातील मुस्लिम कार्यकर्ते आणि समाज प्रश्न विचारू लागला आहे की, मनसेची नेमकी भुमिका काय आहे? पक्षात नेमके काय चालले आहे याकडेही शेख यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, ठाण्याच्या सभेतही राज यांनी पुन्हा एकदा भोंग्याचा मुद्दा उपस्थित करीत भोंगे काढण्यासाठी ३ मे ची डेडलाईन दिल्याने नाराज झालेल्या शेख यांनी गुरूवारी पक्षाचा राजीनामा राज ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. पक्ष स्थापनेपासून काम करत आहे. अनेक आंदोलनात सामील होऊन अनेक गुन्हे अंगावर घेतले. २००८ च्या मराठी पाट्या आंदोलनात पोलिसांनी अटक केली. अंग हिरवे निळे करेपर्यंत मारहाण केली. त्यावेळी आपणच या जखमा विसरू नको, बाकी मी बघतो असे म्हणाला होतात. आता मात्र काय बघायला मिळत आहे. समाजात कुचंबणा दुसरीकडे पक्षात अस्थिर वातावरण आहे. १६ वर्षानंतर आपल्याला अजान, मशीद, मदरसे यांच्यावर अचानक संशय आला. आम्ही तुमच्या सोबत असताना तुम्ही आम्हाला या गोष्टी बोलला असतात तर याचा सोक्षमोक्ष केला गेला असता असे शेख यांनी राजीनामा पत्रत म्हटले आहे.

दरम्यान, शेख यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व गमावल्याची चर्चा राज्यात रंगलेली पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा :

Back to top button