पाकिस्तानी इतिहासात पंतपधानपदाची शोकांतिका कायम; इम्रान यांच्या नावावरही नकोसा ‘पराक्रम’

पाकिस्तानी इतिहासात पंतपधानपदाची शोकांतिका कायम; इम्रान यांच्या नावावरही नकोसा ‘पराक्रम’

इस्लामाबाद; पुढारी ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या पाकिस्तानच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. पाकिस्तानात सत्तापालट झाला असून यावेळी ना पंतप्रधानांनी राजीनामा दिला, ना लष्कराने त्यांना सत्तेतून बाहेर काढले. पाकिस्तानच्या इतिहासात अविश्वास प्रस्तावाद्वारे पंतप्रधान आणि त्यांच्या सरकारला हटवण्याची ही पहिलीच वेळ होती. शनिवारी उशिरा पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारवर अविश्वास व्यक्त करत नॅशनल असेंब्लीने मतदान करून त्यांना घरचा रस्ता दाखवला.

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात शनिवारी मध्यरात्री अविश्वास प्रस्तावावर मतदान केले. यामध्ये इम्रान यांना पराभवाचा सामना करावा लागला. यासह इम्रान खान हे पाकिस्तानच्या इतिहासातील पहिले पंतप्रधान ठरले, ज्यांना अविश्वास ठरावाद्वारे हटवण्यात आले.

इम्रान खान यांनी पंतप्रधानांचे निवासस्थान सोडले

इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) यांनी अविश्वास प्रस्तावाला विरोध केला. ६९ वर्षीय पंतप्रधान इम्रान खान मतदानाच्या वेळी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात उपस्थित नव्हते. त्यांच्या पक्ष पीटीआयच्या खासदारांनीही सभात्याग केला. अविश्वास ठरावावरील मतदानापूर्वीच इम्रान खान पंतप्रधानांच्या निवासस्थानातून बाहेर पडले. पीटीआयचे खासदार फैसल जावेद यांनी ट्विट केले की, "आत्ताच पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधानांचे निवासस्थान सोडले. ते नम्रपणे निघून गेले आणि झुकले नाहीत.

पाकिस्तानात शनिवारी दिवसभर राजकीय धुमशान सुरू होते. बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये रात्री उशिरा सुरू झालेल्या मतदानाच्या निकालांमध्ये, ३४२ सदस्यांच्या नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने संयुक्त विरोधी पक्षाला १७४ सदस्यांचा पाठिंबा मिळाला. ही संख्या पंतप्रधानांना पदच्युत करण्यासाठी आवश्यक १७२ च्या बहुमताने ओलांडली.

विशेष म्हणजे पाकिस्तानातील एकाही पंतप्रधानाने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. या एपिसोडमध्ये इम्रान खान यांनाही त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पद सोडावे लागले आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याचा वादग्रस्त निर्णय रद्द केल्याबद्दल इम्रान खान यांनी शुक्रवारी निराशा व्यक्त केली. ते म्हणाले होते की ते देशातील कोणतेही "आयात सरकार" स्वीकारणार नाहीत.

पंतप्रधानांचे पाऊल "असंवैधानिक"

तत्पूर्वी, सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठाने गुरुवारी इम्रान खान यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याचा नॅशनल असेंब्लीच्या उपसभापतींचा निर्णय एकमताने बाजूला ठेवला. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल असेंब्ली पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले होते. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याचा आणि मुदतपूर्व निवडणुकीची शिफारस करण्याचे पंतप्रधानांचे पाऊल "असंवैधानिक" असल्याचे म्हटले होते.

अविश्वास प्रस्तावावर मतदानासाठी ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता (पाकिस्तानच्या स्थानिक वेळेनुसार) नॅशनल असेंब्लीचे अधिवेशन बोलावण्याचे आदेशही न्यायालयाने खालच्या सभागृहाच्या अध्यक्षांना दिले. अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर न्यायालयाने नवीन पंतप्रधान निवडण्याचे आदेश दिले होते.

इम्रान खान सपशेल अपयशी

प्रसिद्ध क्रिकेटपटू इम्रान खानने खेळाच्या मैदानावर डाव संपवून राजकारणाची इनिंग सुरू केली. २०१८ मध्ये 'नवा पाकिस्तान' निर्माण करण्याचे आश्वासन देऊन ते सत्तेवर आले. तथापि, महागाई आटोक्यात ठेवण्याच्या मूलभूत समस्येचे निराकरण करण्यात ते सपशेल अपयशी ठरले. सध्याच्या नॅशनल असेंब्लीचा कार्यकाळ ऑगस्ट २०२३ मध्ये संपणार होता.

पाकिस्तानमध्ये, पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील महत्त्वपूर्ण अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यासाठी संसदेचे महत्त्वपूर्ण अधिवेशन शनिवारी वेगवेगळ्या कारणांमुळे पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर रात्री नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष असद कैसर आणि उपसभापती कासिम सूरी यांनी राजीनामा दिला.

शनिवारी सकाळी साडेदहा वाजता नॅशनल असेंब्लीचे महत्त्वपूर्ण अधिवेशन सुरू झाल्यानंतर सभापती कैसर यांनी वेगवेगळ्या कारणांमुळे सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब केले. राजीनाम्याच्या घोषणेनंतर, कैसर यांनी पीएमएल-एनचे अयाज सादिक यांना सभागृहाच्या कामकाजाचे अध्यक्षपद भूषवण्यास सांगितले. यानंतर अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले.

८ मार्चपासून टांगती तलवार

विशेष म्हणजे ८ मार्च रोजी विरोधी पक्षांनी इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता. यानंतर खान यांनी यामागे परदेशी षड्यंत्र असल्याचा आरोप करत अमेरिकेवर निशाणा साधला होता. मात्र, अमेरिकेने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले होते.

इम्रान खान यांची सत्तेची इनिंग अविश्वास ठरावाने संपुष्टात आली. यासह, अविश्वास प्रस्तावाद्वारे हटवलेले पंतप्रधान म्हणून त्यांचे नाव पाकिस्तानच्या इतिहासात नोंदवले गेले.

हे ही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news