लाडका हापूस १५ एप्रिलपासून सामान्यांच्या आवाक्यात येणार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

ठाणे ; विश्‍वनाथ नवलू : कोकण पट्ट्यात अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे आतापर्यंत हापुसचे 40 टक्के पीक हाताशी आले. यातील 20 टक्के हापूस परदेशात पोहोचला. तब्बल 25 हजार रुपये पेटी (5 डझन) असा दर असणारा हापूस आता साडेतीन हजारापर्यंत उतरला असून 15 एप्रिलपर्यंत आवक वाढुन हाच दर एका पेटीमागे दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत उतरणार असल्याने आता सर्वसामान्यांच्या ताटातही आमरस दिसू लागेल.

देवगड, रत्नागिरी, अलिबाग येथे वातावरणातील बदलांमुळे यंदा वार्षिक उत्पन्न एकरी 2 लाखांऐवजी 1 लाखांपर्यंत खाली आले. वाशी मार्केटला हंगामात देवगड हापूसच्या 10 ते 12 हजार पेट्या येतात. याशिवाय मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव या मार्केटमध्ये दर दिवशी देवगड हापूसच्या 7 हजार ते 8 हजार पेट्या जात असतात. पहिल्या हंगामात हापूसच्या 5 डझनच्या पेटीचा दर 5 हजारपर्यंत असतो. पूर्ण क्षमतेने हापूस बाजारात आला की हा दर दोन हजारांपर्यंत खाली येतो. सध्या देवगड हापूस आंब्याच्या 5 डझनी पेटीचा भाव साडेतीन ते चार हजार रुपये आहे.

गेल्या आठवड्यापासून मुंबई येथील वाशी मार्केटमधील आवक मंदावली आहे. कोकणातून दररोज 17 ते 18 हजार पेट्या विक्रीसाठी पाठविण्यात येत आहेत. आता दुसर्‍या टप्प्यातील आंबा 15 एप्रिलनंतर सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असला, तरी स्थानिकांना मात्र चव दुर्लभ झाली आहे.

शनिवारी 34,623 पेट्या बाजारात

शनिवार दिनांक 9 एप्रिल रोजी एपीएमसी बाजारात कोकणातील हापूसच्या 24 हजार 727 पेट्या तर इतर राज्यांतून आंब्याच्या 9 हजार 896 पेट्या दाखल झाल्या. अशाप्रकारे एकूण 34 हजार 623 पेट्या एपीएमसी बाजारात दाखल झाल्या. 15 एप्रिल पर्यंत आंब्याची आवक आणखी वाढणार आहे.

कोकणचा हापूस कसा ओळखावा

कोकणातील हापूस

देवगड आंब्याच्या वरील साल पातळ असते. आंबा आकाराने गोलसर तर आतमध्ये केशरी रंगाचा असतो. बाठा कमी आकाराचा आणि चपटा असतो. चवीला अत्यंत गोड असतो.

कर्नाटकचा आंबा

आंब्याची वरची साल जाड असते. आकाराच्या बाबतीत आंबा खालच्या बाजूला निमुळता तर आतमधून पिवळसर रंगाचा असतो. हापूसच्या तुलनेत त्याची चव कमी गोड असते.

अन्य राज्यातील आंबा विक्रीला

कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश येथून हापूस, बदामी, लालबाग, तोतापुरी आंबा विक्रीसाठी येत आहे. दररोज दहा ते बारा हजार क्रेट वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी येत असून, 150 ते 200 रुपये किलो दराने आंबा विक्री सुरू आहे.

हापूस चविष्ट का?

देवगड हापूसला सर्वात चांगली चव आहे. कारण जांभ्या दगडामध्ये हापूसची कलमे आहेत. या आंब्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कॅल्शिअमचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हा आंबा आरोग्यवर्धकही आहे. त्या खालोखाल रत्नागिरी हापूसला जागजिक स्तरावर मागणी आहे. पहिला हापूस बाजारात येतो तो देवगडचा. त्यानंतर रत्नागिरीचा हापूस बाजारात दाखल होतो. सर्वात शेवटी अलिबाग हापूस बाजारात येतो.

बागायतदारांवर निसर्गाचे दुष्टचक्र

ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये आलेल्या मोहोराचे शेतकर्‍यांनी रक्षण केल्याने तो आंबा बाजारात आला. यंदा थंडीचे प्रमाण कमी असल्याने फारसा मोहोर झाला नाही. तसेच अवकाळी पाऊस, उच्च तापमानाचाही फटका बसला.एकूणच े बागायतदारांचे आर्थिक समीकरण बिघडल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news