सिल्व्हर ओक : शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला पूर्वनियोजित कट | पुढारी

सिल्व्हर ओक : शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला पूर्वनियोजित कट

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दक्षिण मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर शुक्रवारी करण्यात आलेला हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. त्यानुसार चौघांनी चार दिवसांपूर्वी सिल्व्हर ओकवर जाण्याचे मार्ग, सिल्व्हर ओक निवासस्थान आणि तेथील सुरक्षा व्यवस्थेची रेकी केल्याची धक्कादायक माहिती गावदेवी पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली आहे.

उच्च न्यायालयाने निकाल जाहीर केल्यानंतर आम्ही शरद पवार यांच्या घरात घुसून त्यांना जाब विचारू, असे चिथावणीखोर वक्तव्य अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी गुरुवारी केले. त्याची दखल घेत त्या दिवसापुरता बंदोबस्त सिल्व्हर ओकवर वाढवण्यात आला. मात्र, त्याच्या दोन दिवस आधीपासूनच पवारांच्या बंगल्यावर चाल करून जाण्याची तयारी आझाद मैदानात सुरू असावी. अटक करण्यात आलेल्या आंदोलकांच्या चौकशीतून ही तयारी उघड झाली.

साधारणत: गेल्या मंगळवारच्या सुमारास म्हणजे हल्ल्याच्या चार दिवस अगोदर चार जणांनी ‘सिल्व्हर ओक’वर जाण्याचे मार्ग, सिल्व्हर ओक निवासस्थान आणि येथील सुरक्षा व्यवस्था याची रेकी केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चौघांचा माग काढला आणि त्यांना अटक केली. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सुमारे 100 आंदोलक आधी बीडी रोडवरील गार्डनजवळ गोळा झाले.

23 महिलांचा त्यात समावेश होता. तेथून ते काही क्षणातच ‘सिल्व्हर ओक’च्या दिशेने चाल करून गेले. या जमावापुढे ‘सिल्व्हर ओक’चा बंदोबस्त फारच तुटपुंजा ठरला. आंदोलकांनी थेट ‘सिल्व्हर ओक’च्या आवारात जात दगड आणि चपला फेकल्या. यात दोन पोलिस जखमी झाले. पोलिसांची जादा कुमक आल्यानंतरच या आंदोलकांना नियंत्रणात आणून ताब्यात घेण्यात आले.

सदावर्तेंचा फोन जप्त, राजकीय लागेबांधे तपासणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व हल्ल्याचा सूत्रधार कोण या दिशेने तपास करताना अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते या हल्ल्याच्या दरम्यान कुणाच्या संपर्कात होते याचा शोध घेतला जात आहे. सदावर्ते यांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून त्याचा सीडीआर काढला जात आहे. हल्ला झाला तेव्हा आणि आधी तसेच नंतर सदावर्ते कुणाकुणाशी बोलले, त्यात कुणी राजकीय नेते आहेत काय, याची माहिती सीडीआरवरून पोलिसांना मिळू शकेल.

Back to top button