यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा
लहान भावाला पाळण्याचा झोका देत असताना सिमेंट खांब कोसळून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना पुसद येथील महावीर नगरात काल बुधवारी घडली. तेजस (वय ६ महिने) व प्राची विजय घुक्से (वय ४ वर्षे) अशी मृत बालकांची नावे आहेत.
विजय घुक्से हे शेतकरी पुसद येथील महावीर नगर येथे राहतात. विजय यांना चार अपत्य आहेत. घुक्से यांचे लक्ष्मीनगर येथे शेत आहे. घटना घडली त्यावेळी ते गाजर काढण्याचे काम करीत होते. त्यांची पत्नी सारिका ही सहा महिन्याच्या तेजस या बाळाला साडीने बांधलेल्या पाळण्याने झोका देत होती. सकाळी ११ वाजता प्राची शाळा आटोपून शेतात आली. भूक लागल्याने आईला जेवण देण्याची विनंती केली. मात्र, आईने तेजसला झोका दे, असे म्हणून आई पाणी आणण्यासाठी घरात गेली. तितक्यात सिमेंटचा निकृष्ट दर्जाचा खांब अचानक तुटून प्राचीच्या डोक्यावर आदळला. त्यामुळे प्राची बेशुद्ध झाली तर तेजस बाजूला फेकला गेला. आई सारिका पाणी घेऊन बाहेर आल्यावर संपूर्ण प्रकार बघितला. तिने आरडाओरड केली. वडील विजय यांनी दोन्ही चिमुकल्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी प्राचीला मृत घोषित केले तर तेजसला नांदेड येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचीही प्राणज्योत मालवली.
या घटनेने पुसद परिसरात शोककळा पसरली आहे.
हे ही वाचा :