सांगली: बारावी परीक्षेसाठी जामीनावर आलेला पुन्हा खुनी हल्ल्यात संशयित आरोपी

सांगली पुढारी वृत्तसेवा : येथील सिव्हिल चौक ते बसस्थानक या रस्त्यावर रोहन रामचंद्र नाईक (वय 29, रा. लक्ष्मीनारायण कॉलनी, शंभर फुटी) या तरुणाच्या खूनप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यातील दोघांना अटक केली आहे. साहेबराव किरमल खैरावकर (वय 21, रा. मार्केट यार्ड) आणि श्रेयस अश्विन शहा (वय 21, रा. कॉलेज कॉर्नरजवळ) या संशयितांचा समावेश आहे. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली.
एका बारमध्ये दोन गटात वाद झाला. तो विकोपाला जाऊन खुनाचा प्रकार घडला असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी सांगितले, मंगळवारी रंगपंचमीमुळे रोहनने पेटिंगचे काम बंद ठेवले होते. दुपारी तो मित्रांच्या बरोबर रंग खेळण्यासाठी गेला होता. एकाच्या अंगावर रंग पडल्याने संशयित आणि त्यांच्यात वाद झाला. दोन्ही गट समोरासमोर आले होते. त्यानंतर हा वाद संपवला होता.
सायंकाळी एका बारमध्ये हे दोन्ही गट एकत्र आले. त्यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला. तोही मिटला. त्यानंतर रोहन आणि त्याचे मित्र बाहेर पडून सिव्हिल चौकाकडे सायंकाळी साडेसातच्या सुमारास जात होते. त्यावेळी सहा जणांचे टोळके पाठीमागून आले. त्यांनी रोहनचा पाठलाग सुरू केला.
रोहन पळत असताना एकाने गुप्तीने त्याच्या पाठीत वार केला. त्यामुळे तो खाली कोसळला. नंतर आणखी वार करण्यात आले. त्यामुळे तो जागीच ठार झाला. त्यानंतर हल्लेखोर आणि रोहन बरोबर असलेले त्याचे साथीदारही पसार झाले. पोलिसांनी रात्री शोध घेऊन चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यातील खैरावकर आणि शहा या दोघांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांना अटक केली. इतर दोघांकडे चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यातील दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी सांगितले.
मुख्य संशयित परीक्षेसाठी बाहेर आला होता
या गुन्ह्यातील मुख्य संशयित हा अद्याप फरार आहे. एका खुनाच्या गुन्ह्यात तो कारागृहात होता. बारावी परीक्षेसाठी त्याला तात्पुरता जामीन मिळाल्याने तो बाहेर आला होता. त्या कालावधीत त्याने रोहनवर हल्ला केला आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत.