पाटणकरांना 30 कोटी देणारा चतुर्वेदी परदेशात पळाला? | पुढारी

पाटणकरांना 30 कोटी देणारा चतुर्वेदी परदेशात पळाला?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या खात्यात बनावट कंपनीद्वारे 30 कोटी रुपये जमा करणारा भारताचा एक हवालासम्राट नंदकिशोर चतुर्वेदी देशाबाहेर पसार झाल्याचे वृत्त आहे. मात्र, या चतुर्वेदीचे लोअर परळमध्ये असलेले कार्यालय ‘ईडी’ने शोधून काढले असून, या कार्यालयावर ‘ईडी’ने बुधवारी चौकशीचे समन्स चिकटवले. सूत्रांच्या माहितीनुसार, चतुर्वेदी मे 2021 पासून आफ्रिकेतील एखाद्या देशात स्थायिक झालेला असू शकतो.

पुष्पक ग्रुप ऑफ कंपनीतील पुष्पक बुलियनविरोधात दाखल गुन्ह्याच्या तपासात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी श्रीधर पाटणकरांच्या ठाण्यातील निलांबरी अपार्टमेंटचे 11 फ्लॅटस् जप्त केले. हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदीने हमसफर डिलर्स प्रा. लि. या बनावट कंपनीद्वारे पाटणकरांना दिलेल्या 30 कोटी रुपयांतूनच हे फ्लॅटस् ‘पुष्पक’ने खरेदी केले, असा ‘ईडी’ला संशय आहे. या 11 फ्लॅटस्ची किंमत 6 कोटी 45 लाख रुपये दाखवण्यात आली आहे.

‘ईडी’च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चतुर्वेदी हा पाटणकर यांना 2009 पासून ओळखतो. त्यामुळेच ‘ईडी’ला चतुर्वेदीची चौकशी करायची आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणकरांनाही ‘ईडी’कडून कधीही बोलावणे येऊ शकते. चतुर्वेदी याच्या एकाच पत्त्यावर दहापेक्षा अधिक बनावट कंपन्यांची नोंद ‘ईडी’ला आढळली आहे. त्यामुळे ‘ईडी’चे समन्स त्याच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता धुसर आहे.

‘बीकेसी’तही भूखंड प्रकरण

चतुर्वेदी याच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील एका भूखंडाच्या व्यवहाराचीही ‘ईडी’ आणि प्राप्तिकर खात्याकडून मार्च 2021 पासून चौकशी सुरू आहे. या व्यवहाराचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. जप्त फ्लॅटस् वादग्रस्त पुष्पक ग्रुप ऑफ कंपनीच्या नावावर झालेले नसल्याचे समजते. या फ्लॅटस्चे फक्त अ‍ॅग्रीमेंट करण्यात आलेले आहे. ‘पुष्पक’च्या नावावर झाल्यास ते जप्त होतील, अशी भीती असल्यामुळेच अ‍ॅग्रीमेंटपुरता व्यवहार करण्यात आला असावा. मात्र, चतुर्वेदीने पाटणकरांच्या खात्यावर जमा केलेल्या 30 कोटी रुपयांचे धागे हाती लागले आणि ‘ईडी’चे हात या व्यवहारापर्यंत पोहोचले.

Back to top button